गोतस्करांकडून दगडांनी ठेचून बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या

यवतमाळमधील घटना; कडक कायद्यानंतरही महाराष्ट्रात गोवंश तस्करीचे सत्र सुरूच

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
just now
गोतस्करांकडून दगडांनी ठेचून बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या

यवतमाळ : महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही गोवंश तस्करीचे गंभीर प्रकार थांबलेले नाहीत. याचाच प्रत्यय यवतमाळ जिल्ह्यात आला. महागाव तालुक्यातील बिजोरा टोल नाक्याजवळ गोवंश तस्करांनी केलेल्या भीषण दगडफेकीत आणि लाकडी दांडक्यांच्या हल्ल्यात गजानन सुरोशे या गोरक्षकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महागाव आणि उमरखेड परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, सुकळी गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बिजोरा टोल नाक्यावर मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. रात्रीच्या वेळी बजरंग दलाचे काही कार्यकर्ते या परिसरात उभे होते. त्याच वेळी तिथून एक संशयास्पद पिकअप वाहन वेगाने जाताना दिसले. त्या वाहनात आठ ते दहा गोवंश असल्याची शंका आल्याने कार्यकर्त्यांनी दुचाकीवरून त्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. मात्र, स्वतःचा बचाव करण्यासाठी गो-तस्करांनी कार्यकर्त्यांच्या दुचाकीला जोरदार कट मारून खाली पाडले, यामध्ये दोन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले.

याच दरम्यान, गजानन सुरोशे हे आपल्या कारने त्याच मार्गावरून जात होते. दुचाकीला धडक देऊन पळणाऱ्या पिकअप वाहनाचा त्यांनी कारने पाठलाग सुरू केला. हे तस्करांचे वाहन हायवेवरून सुकळी गावाच्या दिशेने वळाले. गजानन यांनी आपली कार त्यांच्या मागे नेली असता, गो-तस्करांनी संघटित होऊन त्यांच्या कारवर तुफान दगडफेक सुरू केली. यानंतर खाली उतरून तस्करांनी लाकडी दांडके आणि काठ्यांनी गजानन यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. या भीषण मारहाणीत आणि दगडफेकीत गंभीर जखमा झाल्यामुळे गजानन सुरोशे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर कारवाईच्या भीतीने वाहनातील सर्व जनावरे तिथेच सोडून तस्करांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला.

या घटनेची माहिती मिळताच बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात एकच गर्दी केली. दोषी आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा (महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा) लागू असूनही, अशा प्रकारे तस्करांकडून कायद्याला केराची टोपली दाखवली जात असल्याचे यावरून स्पष्ट होते. धार्मिक भावना आणि कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन करून होणारी ही तस्करी आता गोरक्षकांच्या जीवावर बेतू लागली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फरार गो-तस्करांचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.


हेही वाचा