आसाममध्ये 'एसीएस' अधिकाऱ्याच्या घरावर छापा; १.१८ कोटींची रोकड जप्त

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
2 hours ago
आसाममध्ये 'एसीएस' अधिकाऱ्याच्या घरावर छापा; १.१८ कोटींची रोकड जप्त

गुवाहाटी: आसाममध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक मोठी कारवाई करत आसाम नागरी सेवेतील वरिष्ठ अधिकारी लाचित कुमार दास यांच्या घरावर छापा टाकला आहे. या कारवाईत त्यांच्या घरातून तब्बल १.१८ कोटी रुपयांची रोकड आणि मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. लाचित कुमार दास हे भूमी अभिलेख विभागात अतिरिक्त संचालक म्हणून कार्यरत असून, त्यांना गुवाहाटीतील रूपनगर येथील कार्यालयात ४५,००० रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीच्या खरेदी-विक्री परवान्यासाठी लागणारे 'ना हरकत प्रमाणपत्र' देण्यासाठी दास यांनी तक्रारदाराकडे १ लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराच्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कार्यालयातच सापळा रचला आणि पंचांसमक्ष लाचेची रक्कम स्वीकारताना दास यांना बेड्या ठोकल्या.

लाचखोर अधिकाऱ्याच्या बेल्टोला येथील 'राणी बागन' निवासस्थानी घेतलेल्या झडतीत लॉकरमधून ४८.३८ लाख रुपयांची रोकड, तर स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या नावावरील ८० लाख रुपयांची मुदत ठेव प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली.

त्यानंतर झालेल्या पुढील तपास आणि छापसत्रात एकूण १.१८ कोटी रुपयांची रोकड आणि दोन मोठ्या भूखंडांची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपमहानिरीक्षक वेदांत माधव राजखोवा यांनी या मोठ्या वसुलीला दुजोरा दिला आहे. संशयित आरोपी लाचित कुमार दास यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांची कोट्यवधींची बेहिशोबी मालमत्ता जप्त केल्यानंतर आता या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सुरू आहे.


हेही वाचा