जिद्द, मेहनत आणि असामान्य प्रतिभेच्या जोरावर आशाताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले. लता मंगेशकर यांच्यासारख्या महान बहिणीसोबत उभे राहत, स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणे हे सहज शक्य नव्हते; परंतु आशाताईंनी ते करून दाखवले.

भारतीय संगीत सृष्टीतील जादुई आवाज आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीतातील एक सुवर्णयुग संपले असून संपूर्ण जगातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. ‘स्वरांच्या दुनियेतील ऊर्जा’ असे ज्यांचे वर्णन केले जाते, त्या आशा भोसले केवळ एक गायिका नव्हत्या, तर त्या संगीतातील एक संस्था होत्या. त्यांच्या आवाजातील लचक, स्पष्ट शब्दोच्चार आणि कोणत्याही प्रकारच्या गाण्याला स्वतःच्या शैलीत ढळण्याची कला यामुळे त्यांनी गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आशाताईंचे बालपण संघर्षात गेले. वडील पं. दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांनी आणि लतादीदींनी लहान वयातच गायनाला सुरुवात केली. दीदींचा आवाज शास्त्रीय आणि सुगम संगीतासाठी सर्वोत्तम मानला जात असताना, आशाताईंनी स्वतःची एक वेगळी, पाश्चात्य आणि बंडखोरी धाटणीची ओळख निर्माण केली. शास्त्रीय संगीत, भावपूर्ण गझला, भक्तिगीते, लावणी ते अगदी आधुनिक पॉप गाण्यांपर्यंत आशाताईंचा आवाज तितक्याच ताकदीने फिरला.
आर. डी. बर्मन आणि आशाताई या जोडीने भारतीय चित्रपट संगीताला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. 'दम मारो दम', 'पिया तू अब तो आजा' यासारख्या गाण्यांनी तरुणाईला वेड लावले. त्याचबरोबर मराठी मनाला भुरळ घालणाऱ्या 'बुगडी माझी सांडली गं' पासून ते 'मी मज हरपून बसले ग' पर्यंतची त्यांची गाणी अजरामर आहेत. आशाताईंच्या नावावर २० हून अधिक भाषांमध्ये १२,००० हून अधिक गाणी गाण्याचा 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' आहे. त्यांनी कधीही आपल्या वयाला गायनाआड येऊ दिले नाही; ९२ व्या वर्षीही त्या स्टेजवर तीन-तीन तास उभ्या राहून गाऊ शकत होत्या. संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने ‘पद्मविभूषण’ आणि ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. आशा भोसले यांच्या निधनाने संगीताचा एक 'झरा' आटला आहे. त्यांचा आवाज येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांच्या स्वरात केवळ सूर नव्हते, तर जीवनातील विविध छटा, भावना आणि काळाचा स्पर्श होता. म्हणूनच त्यांच्या गाण्यांनी पिढ्यानपिढ्या रसिकांना भुरळ घातली. त्यांच्या कारकिर्दीचा प्रवास संघर्षमय होता. परंतु जिद्द, मेहनत आणि असामान्य प्रतिभेच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले. लता मंगेशकर यांच्यासारख्या महान बहिणीसोबत उभे राहत, स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणे हे सहज शक्य नव्हते; परंतु आशाताईंनी ते करून दाखवले.
वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी 'माझं बाळ' (१९४३) या मराठी चित्रपटासाठी 'चला चला नव बाळा' हे पहिले गाणे त्यांनी गायले होते. 'चुनरिया' चित्रपटातील 'सावन आया' या गाण्याने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. 'रात की रानी' या चित्रपटात त्यांनी त्यांचे पहिले सोलो हिंदी गाणे रेकॉर्ड केले होते. सुरुवातीच्या काळात त्यांना प्रामुख्याने दुसऱ्या श्रेणीतील चित्रपटांसाठी किंवा नर्तिकांवर चित्रित होणाऱ्या गाण्यांसाठी बोलावले जायचे. १९५७ मध्ये बी. आर. चोप्रांच्या 'नया दौर' चित्रपटाने त्यांच्या कारकिर्दीला मोठी कलाटणी दिली. ओ. पी. नय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली होती. १९६० ते १९९० हा त्यांचा सुवर्णकाळ मानला जातो. ‘पंचमदा’ अर्थात आर. डी. बर्मन यांच्या संगीतावर आशाताईंनी गायलेली 'दम मारो दम', 'पिया तू अब तो आजा' आणि 'चुरा लिया है' यासारखी गाणी प्रचंड गाजली होती. त्यांनी चित्रपटांमधून गझल क्षेत्रातही आपली मोहोर उमटवली. 'दिल चीज क्या है' साठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. २०१३ मध्ये त्यांनी 'माई' या चित्रपटाद्वारे अभिनयातही पदार्पण केले होते. गोव्याच्या सांस्कृतिक परंपरेचा गंध त्यांच्या गाण्यांतून जाणवत असे. त्या केवळ राष्ट्रीय नव्हे, तर गोमंतकाच्या भूमीचीही गौरवशाली कन्या होत्या. जरी त्यांचा जन्म गोव्याबाहेर झाला होता, तरी त्यांचे मंगेशकर घराणे, परंपरा, संगीताची जाण आणि संस्कार हे गोव्याच्या भूमीतूनच आलेले आहेत. गोव्याची भक्तीपरंपरा, नाट्यसंगीत आणि सांस्कृतिक वारसा यांचा प्रभाव त्यांच्या गायकीत जाणवतो, असे म्हटले जात असे. तसे पाहता, त्यांचे गोव्याशी नाते हे वंशपरंपरेने, संस्कृतीने आणि भावनेने जुळलेले होते. आयुष्यातील प्रत्येक संकटावर हसत मात करणाऱ्या या महान गायिकेला भावपूर्ण श्रद्धांजली!