पूर्णपणे बेकायदा व्यवसाय करून बर्च क्लबच्या दुर्घटनेत २५ लोकांचे बळी जातात आणि मालक, चालक, व्यवस्थापक सारेच जामिनावर सुटतात; यावरून तपासासह कायद्याची बाजूही कुठेतरी लंगडी पडली, असेच म्हणावे लागेल. या दुर्घटनेमुळे गोव्यातील प्रशासकीय व्यवस्था कशा पद्धतीने काम करते, ते उघड झाले होते.

बर्च क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा यांना जामीन मिळाल्यामुळे ते आता तुरुंगाबाहेर आहेत. त्यांना जामीन मिळणार नाही, अशा पद्धतीने पोलीस हे प्रकरण हाताळतील असे वाटत असताना २५ लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले हे दोघेही बंधू आता जामिनावर बाहेर आले. ज्या पर्यटकांचा आणि कर्मचाऱ्यांचा या घटनेत नाहक बळी गेला, त्यांना न्याय कधी आणि कसा मिळेल, ते आता खटल्याच्या पुढील सुनावणीवर अवलंबून आहे. तूर्तास गोव्याच्या पर्यटन क्षेत्राच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांना जामीन मिळून ते बाहेर आले आहेत.
६ डिसेंबर २०२६ च्या रात्री हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या क्लबमध्ये भीषण आग लागून त्यात काहींचा होरपळून तर काहींचा श्वास गुदमरून मृत्यू झाला होता. चौकशीत या क्लबमधून आणीबाणीच्या काळात बाहेर येण्यासाठी मार्ग नव्हता किंवा आगीसारख्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिथे कुठल्याच प्रकारची सामग्री नव्हती, असे उघड झाले होते. क्लब मिठागराच्या जागेत आणि ‘सीआरझेड’ क्षेत्रात होता. तेथे बेकायदा बांधकाम होते. पंचायतीने व्यापार परवाना नूतनीकरण केले नसतानाही क्लब सुरूच होता. आरोग्य खात्याची खोटी ‘एनओसी’ दाखवून एक्साईजचा परवाना मिळवण्यात आला होता. अग्निशमन दलाचाही परवाना नव्हता. म्हणजेच, कोणत्याही कायदेशीर बाबींची पूर्तता न करता बनावट कागदपत्रांच्या आधारे सुरू असलेल्या या क्लबच्या मालकांना जामीन मिळतो, यावरून तपासाच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. सरकारने न्यायालयात कठोर भूमिका घेतली होती का, तेही पहावे लागेल. पूर्णपणे बेकायदा व्यवसाय करून त्या क्लबच्या दुर्घटनेत २५ लोकांचे बळी जातात आणि मालक, चालक, व्यवस्थापक सारेच जामिनावर सुटतात; यावरून तपासासह कायद्याची बाजूही कुठेतरी लंगडी पडली, असेच म्हणावे लागेल. या दुर्घटनेमुळे गोव्यातील प्रशासकीय व्यवस्था कशा पद्धतीने काम करते, ते उघड झाले होते. सरकारी यंत्रणेची या आणि अशा कित्येक क्लबवर कृपादृष्टी होती म्हणूनच त्यांचे बेकायदा व्यवसाय थाटात सुरू होते. या दुर्घटनेने गोव्याच्या पर्यटन क्षेत्राची प्रचंड बदनामी केली. सरकारचीही बदनामी झाली. किमान या घटनेमुळे आणि सरकारची झालेली बदनामी यामुळे लुथरा बंधूच नव्हे, तर या क्लबशी संबंधित कोणाचीही सहजपणे सुटका होणार नाही यासाठी सरकारने पूर्ण ताकद लावण्याची गरज होती. प्रकरण थंड पडल्यानंतर साडेतीन महिन्यांनंतर लुथरा बंधू जामिनावर सुटले आणि सगळेच जण या घटनेचा विसर पडल्यासारखे शांत राहिले.
बर्च क्लबच्या दुर्घटनेत २५ लोकांचे बळी गेले होते, तर सहाजण जखमी झाले होते. येथे लोक होरपळून मरत असताना हेच लुथरा बंधू देशाबाहेर पळून गेले होते. असे असतानाही त्यांना जामीन मिळतो यावरून सरकारची बाजू न्यायालयात कमकुवत ठरली, हे स्पष्ट आहे. बर्च क्लब दुर्घटना ही भ्रष्टाचारामुळे घडलेली दुर्घटना होती. त्यात अनेकांचे हितसंबंध होते, असे आरोपही झाले. अनेकांवर गुन्हे नोंद झाले. सरपंच, पंचायत सचिव, क्लबचे मालक, व्यवस्थापक अशा सर्वांना अटक झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसारमाध्यमांनी ही घटना भ्रष्ट यंत्रणेमुळे घडल्याचे वार्तांकन करून गोव्याची बदनामी केली. त्यामुळे सरकार किमान या घटनेला जबाबदार असलेल्यांना सहजपणे सुटू देणार नाही असे दिसत होते, परंतु बेकायदा क्लब चालवून दुर्घटनेला जबाबदार ठरलेले व्यवस्थापन आणि बनावट सरकारी दाखले मिळवून सरकारी यंत्रणेला आव्हान देणारे मालक या सर्वांची सहजपणे जामिनावर सुटका झाली. आता खटल्याची सुनावणी होईल. पोलिसांनी यापूर्वीच ४,१५० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे, ज्यात १३ लोकांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. गोवा पोलिसांनी केलेल्या तपासाच्या आधारे सरकार कठोर भूमिका घेऊन या दुर्घटनेला जे लोक जबाबदार आहेत त्यांना शिक्षा होईल अशा पद्धतीने बाजू मांडेल, अशी अपेक्षा ठेवूया. ज्या निष्पाप लोकांचे बळी या दुर्घटनेत गेले आहेत, त्यांची जबाबदारी निश्चित व्हायला हवी. कुठल्याच बेकायदा व्यवसायाला खतपाणी न घालता त्यावर थेट बडगा उगारण्याची हिंमत सरकारी यंत्रणांनीही ठेवायला हवी. अन्यथा अशा दुर्घटना घडून त्यात राज्याची किती हानी होते, ते या दुर्घटनेने दाखवून दिले आहे.