मोरजी पर्यटक मारहाण प्रकरणी दोन्ही गटांत समेट

आमदार जीत आरोलकर यांची यशस्वी मध्यस्थी : वादावर पडदा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
34 mins ago
मोरजी पर्यटक मारहाण प्रकरणी दोन्ही गटांत समेट

पेडणे : मोरजी समुद्रकिनाऱ्यावर सावंतवाडी येथील पर्यटकांना रविवारी झालेल्या मारहाणीच्या घटनेचे तीव्र पडसाद सोमवारी (२५ मे) पत्रादेवी सीमाभागात उमटले. संतप्त नागरिक आणि पर्यटकांच्या समर्थकांनी राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडल्यामुळे पत्रादेवी-बांदा-सिंधुदुर्ग मार्गावरील वाहतूक सुमारे एक तास पूर्णपणे ठप्प झाली होती. बांदा व सिंधुदुर्ग परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने गोळा झाल्याने सीमाभागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी तातडीने पुढाकार घेत केलेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर हा वाद अखेर सामोपचाराने मिटला आहे.

घटनेची माहिती मिळताच दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांची समजूत काढली आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. तणावाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी संध्याकाळी उशिरा स्थानिक मोरजी येथील युवक आणि मारहाण झालेल्या सिंधुदुर्गातील पीडित कुटुंबियांना एकत्र चर्चेसाठी बोलावले. आमदार आरोलकर यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे शांततेत ऐकून घेत स्वतंत्र बैठक घेतली. दोन्ही गटांमधील गैरसमज दूर करण्यात आल्यानंतर या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला.
‘अतिथी देवो भव’ ही भावना जपा: आमदार आरोलकर
यावेळी आमदार जीत आरोलकर यांनी गोव्याची संस्कृती, आदरातिथ्य आणि पर्यटन क्षेत्राची प्रतिमा जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, गोव्यात देशी-विदेशी पर्यटक मोठ्या विश्वासाने आणि आशेने येत असतात. ‘अतिथी देवो भव’ ही आपली परंपरा असून पर्यटकांना सुरक्षित वातावरण देणे, हे आपले कर्तव्य आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे गोव्याची आणि विशेषतः किनारी भागाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलिन होते. त्यामुळे स्थानिक युवकांनी कोणत्याही परिस्थितीत संयम राखून वाद टाळले पाहिजेत. आमदारांच्या या आवाहनानंतर आणि मध्यस्थीनंतर दोन्ही गटांनी शांततेचा मार्ग स्वीकारत आपापसातील वाद मिटवण्याची तयारी दर्शवली. यानंतर बांदा तसेच सिंधुदुर्गातील पोलीस अधिकाऱ्यांनीही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली असून सध्या सीमाभागात शांतता प्रस्थापित झाली आहे.

हेही वाचा