भाज्यांचे दर चढेच : अवकाळी पाऊस, आवक कमी झाल्याचा परिणाम

पणजी : अवकाळी पाऊस (Unseasonal rain) तसेच आवक कमी असल्याने पणजी बाजारात विविध भाज्यांच्या दर चढेच आहेत. सोमवारी पणजी बाजारात वालपापडी दर २४० रुपये किलो होते. टोमॅटोचे दर वाढून ६० रुपये किलो झाले. लिंबू १० रुपयांना एक या दराने विकला जात होता. भेंडी १०० रुपये किलो होती, तर लसूण आकारानुसार ४०० ते ६०० रुपये किलो होता. कोथिंबीरची जुडी ४० रुपयांना होती. पुढील काही दिवस भाज्यांचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.
बाजारात बटाटा ५० रुपये किलो, तर कांदा ४० रुपये किलो होता. कांदा ४० रुपये किलो होता. गवार गाजर, कारले प्रत्येकी ८० रुपये किलो दराने विकले जात होते. दोडक्याचे दर वाढून १०० रुपये किलो झाले. वांगी आणि काकडीचे दर प्रत्येकी ६० रुपये किलो होते. मोठी वांगी ८० रुपये किलो होती. कोबी ४० रुपये किलो, तर फ्लॉवर ५० रुपये प्रती गड्डा होता. याशिवाय पुदिना १५ रुपये होता. आले दर्जानुसार २५० ते ३०० रुपये किलो होते.
बाजारात मिरची ८० रुपये, तर ढब्बू मिरची १०० रुपये किलो होती. मानकुराद आंबा आकारानुसार २०० ते ५०० रुपये डझन या दरात विकले जात होते, तर हापूस आंबा ५०० ते ८०० रुपये डझन होते. सेंदुला आंबा १५० रुपये, तर मांगीलाल आंबा ४०० रुपये डझन होता. जांभूळ २०० रुपयेला १०० नग, करवंद १०० रुपये वाटा या दराने विकले जात होते. बाजारात लहान नीरफणस ३०० रुपये, तर मध्यम आकाराचा नीरफणस ५०० रुपये नग या दराने विकले जात होते.
‘फलोत्पादन’कडे कमी दरात उपलब्ध
फलोत्पादन मंडळाच्या गाड्यांवर कांदा २३ रुपये, टोमॅटो ४४ रुपये, तर बटाटा २४ रुपये किलो होता. भेंडी २० रुपये, कोबी २४ रुपये, गाजर ४४ रुपये, वाल पापडी १०५ रुपये, मिरची ५० रुपये किलो दराने विकली जात होती. शेवगा ८९ रुपये, आले १७५ रुपये, लसूण २६३ रुपये किलो होता.