
पेडणे : मोरजी येथील 'मे फेअर रिसॉर्ट' हॉटेलच्या व्यवस्थापकाकडे खंडणी मागितल्याच्या कथित प्रकरणात अटक करण्यात आलेले संशयित राजेश दाभोळकर यांना पेडणे येथील प्रथमवर्ग न्यायालयाने जामीन मंजूर केला. २५,००० रुपयांच्या वैयक्तिक हमीवर त्यांची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
दाभोळकर यांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, दाभोळकरांविरुद्ध लावण्यात आलेले आरोप हे केवळ कथित स्वरूपाचे असून, खंडणी वसूल केल्याचा कोणताही सबळ पुरावा पोलिसांकडे उपलब्ध नाही. फार फार तर संशयिताने केवळ खंडणी मागण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जाऊ शकतो, परंतु गुन्हा सिद्ध करणारे कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात आले नाहीत.
तसेच, तक्रारदाराने ऑक्टोबर २०२५ ते ७ मे २०२६ दरम्यान खंडणी मागितली गेल्याचा दावा केला असला, तरी पोलिसांत तक्रार नोंदवण्यास झालेला विलंब आणि पुराव्यांचा अभाव यामुळे न्यायालयाने पोलिसांची कोठडीची मागणी फेटाळून लावली. ज्या मेफेअर हॉटेलच्या व्यवस्थापनाने ही तक्रार केली आहे, त्यांच्याच बेकायदेशीर बांधकामाविरोधात 'एनजीटी'मध्ये (NGT) एक याचिका प्रलंबित असल्याची माहितीही समोर आली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दाभोळकर यांना जामीन मंजूर केला.