
उत्तर प्रदेशातील एक कुख्यात चोर तब्बल ४०० हून अधिक चोरी करून आठ राज्यांमध्ये वॉन्टेड होता. या आरोपीची चलाखी आणि धाडस इतकी जबरदस्त होती की एका चोरीनंतर पोलिसांपासून बचाव करण्यासाठी तो तब्बल पाच तास तलावात पाण्याखाली लपून बसला. या काळात त्याने कमळाच्या देठातून श्वास घेत स्वतःला जिवंत ठेवले.
ही थरारक घटना मध्य प्रदेशातील जबलपूर येथे रीवा-इतवारी एक्सप्रेस ट्रेनमध्ये घडली. एसी कोचमधील एका महिलेची पर्स चोरीला गेल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाने संशयित तरुणाचा शोध सुरू केला. ट्रेन सिहोरा रोड स्थानकाजवळ मंदावल्याचा फायदा घेत आरोपीने चालत्या ट्रेनमधून उडी मारली. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला असता तो थेट जवळच्या तलावात उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला.
तलाव खोल आणि शेवाळाने भरलेला असल्याने तसेच अंधारामुळे आरोपी पोलिसांच्या नजरेआड झाला. खितौला पोलीस ठाणे आणि गोताखोरांच्या पथकाने मोठी शोधमोहीम राबवली, मात्र सुरुवातीला काहीच धागादोरा मिळाला नाही. आरोपी पाण्याखालीच लपून बसला होता आणि कमळाच्या देठातून हवा घेत होता. अखेर सुमारे पाच तासांच्या प्रयत्नांनंतर गोताखोरांनी त्याला शोधून काढले.
अटक केल्यानंतरही आरोपी पोलिसांची दिशाभूल करत होता. सुरुवातीला त्याने स्वतःचे नाव ‘बबलू’ आणि पत्ता चंदीगड असा सांगितला. मात्र, ठाणे प्रभारी राजीव खरब यांना त्याच्यावर संशय आला. त्यांनी २०१८ मध्ये ‘सनी’ नावाच्या एका वॉन्टेड चोराचा फोटो जतन करून ठेवला होता. पकडलेल्या आरोपीचा चेहरा त्याच्याशी मिळताजुळता असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याला ‘सनी’ म्हणून हाक मारली आणि त्याने अखेर आपली खरी ओळख उघड केली.
चौकशीत आरोपीचे खरे नाव हरविंदर सिंह उर्फ सनी (वय ३२) असल्याचे समोर आले. तो उत्तर प्रदेशातील बिजनौरचा रहिवासी असून देशभरात ४०० पेक्षा अधिक चोरी केल्याचे उघड झाले आहे. २०१७ मध्ये तो बिजनौरच्या हल्दौर नगरपालिकेत अपक्ष नगरसेवकही होता.
हरविंदर सिंह उर्फ सनी याच्यावर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि मुंबईसह विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. प्रत्येक गुन्ह्यानंतर तो सिम कार्ड बदलत असे आणि कोणतेही ओळखपत्र जवळ बाळगत नसे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २०१८ मध्ये त्याच्याकडून सुमारे ७० लाख रुपयांचे हिरे-जवाहरात जप्त करण्यात आले होते. याशिवाय त्याने अवंतिका एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाची परवानाधारक पिस्तूल आणि रोख रक्कमही चोरली होती. तो नेहमी एसी कोचला लक्ष्य करत असे. टीसीपासून बचावासाठी तो बाथरूममध्ये लपून बसत असे आणि विनातिकीट प्रवास करत असे. सध्या जबलपूर पोलिसांकडून तपास केला जात आहे.
- प्रसन्ना कोचरेकर