शांती म्हणजे ज्याचे अस्तित्व सतत आहे. पृष्ठभागावर जे घडत असते, ती अशांतता असते. हे अगदी एखाद्या महासागरासारखे आहे. महासागराच्या पृष्ठभागावर तुम्ही लाटा बघता, प्रचंड खळबळ आणि कल्लोळ चाललेला असतो. परंतु तुम्ही खोलवर गेलात तर तिथे पूर्ण शांती असते.

सद्गुरू : तुमच्या मानसिक स्थितीचा वास्तवाशी काहीही संबंध नसतो. या क्षणी, आपण स्वर्गात आहोत असे वाटून तुम्ही काही काळासाठी अत्यानंदित होऊ शकता किंवा हे साक्षात सैतानाचे घर आहे असे वाटून भयभीत आणि पीडित होऊ शकता. हे तुम्हीच तुमच्या मानासोबत करू शकता, नाही का? हे मन आहे. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कोणत्याही वेळी तुमच्या मनात तुम्ही काहीही निर्माण करू शकता. तुम्ही हे सगळे जागरूक राहून न करता नकळत करत असल्याने तुम्हाला वाटते की हे वास्तव आहे.
समजा, तुम्ही एका नाटकामध्ये भाग घेत आहात. एकाक्षणी तुम्ही कुठल्या अनोळखी व्यक्तीप्रती प्रेमळ बनता. पुढच्या क्षणी ते संपलेले असते. हीच तुमच्या मनाची सुद्धा स्थिती आहे. तुमच्या मनात तुम्ही करत असलेल्या बहुतेक गोष्टी अजागरूक अवस्थेत घडतात, म्हणून तुम्हाला वाटते की हेच वास्तव आहे. ते वास्तव नाही. तो एक प्रकारचा भ्रम आहे.
आता जेव्हा तुम्ही सतत भ्रम निर्माण करता, तेव्हा तुमचा वास्तवाशी संपर्क तुटतो. काही वेळा तुम्ही चांगला भ्रम निर्माण कराल, काही वेळा तुम्ही वाईट भ्रम निर्माण कराल. चांगला भ्रम हा वाईट भ्रमापेक्षाही जास्त वाईट असतो, कारण जेव्हा तुम्ही वाईट भ्रमामध्ये फसता, तेव्हा किमान तुमची त्यातून बाहेर येण्याची इच्छा असते. असत्यातून बाहेर येण्याची इच्छा तुमच्यात निर्माण होईल. जेव्हा तुम्ही चांगल्या भ्रमामध्ये फसता तेव्हा त्यातून बाहेर निघण्याची इच्छा निर्माण होणार नाही. तुम्ही हा भ्रम कायम ठेवीत राहाल.
बहुतेक लोकांच्या बाबतीत मी पाहतो की, जेव्हा त्यांच्या आयुष्याचा शेवटचा क्षण येतो, तेव्हा ते चकित होतात. हे सर्व आता संपले, यावर त्यांचा विश्वास बसत नाही, कारण ते कधी सुरूच झालेले नसते. त्यांचे संपूर्ण आयुष्य भ्रमात जाते - सर्व प्रकारचे विचार पण काहीच जीवन नाही. जरा पहा, की ९० % वेळी आपण केवळ जीवनाविषयी विचार
करीत असतो. जगत नसतो. नाही का? जेव्हा मृत्यू येतो तेव्हा आपल्याकडे काय असते? जेव्हा तो येतो तेव्हा आपण मागे वळून पाहतो, आपले जीवन अर्थपूर्ण होते का? जीवन अर्थपूर्ण असले पाहिजे, नाही का? नाहीतर कशाला काय अर्थ आहे? ते अर्थपूर्ण तेव्हाच होईल जेव्हा आपण भ्रमात न जगता वास्तवासोबत जगू.
तणाव मुक्त जीवन
तुमचे शरीर, मन, भावना आणि ऊर्जा हीच ती वाहने आहेत ज्यांच्यातून तुम्ही तुमचा जीवन प्रवास करत आहात. त्यांना समजून न घेता, त्यांच्यावर कुठलेही नियंत्रण न मिळवता किंवा ते कसे काम करतात याविषयी कोणताही खरा अनुभव न मिळवता, तुम्ही तुमचे जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहात. हे एक आकस्मितपणे घडणारे अस्तित्व आहे. जेव्हा तुम्ही असे आकस्मित अस्तित्व जगता, तेव्हा तुम्ही जीवनात जर कुठे पोहचू शकलात तर ते केवळ अपघाताने
असेल. म्हणून तुम्ही यासाठी काहीतरी करणे गरजेचे आहे; तुम्हाला या चार गोष्टींवर ताबा मिळवायला हवा. हे जर झाले नाही तर तुम्ही जीवन आकस्मितपणे जगाल. तुम्ही नेहमी या आशेवर राहाल की कसेतरी करून सगळं चांगले होईल.
शांतीचा मार्ग
शांती अनेक मार्गांनी मिळवता येते. असे समजा की भरपेट खाऊन तुम्ही आडवे झालेले आहात, बघा तुम्ही किती शांत असता. दुसरा एखादा मद्य घेईल आणि खूप शांत होईल. ज्यावेळी तुमचा अहंकार सुखावतो त्यावेळी तुम्ही खूप शांत असता. तुम्ही जिथे जिथे जाता, तिथली माणसे तुमचे समर्थन करण्यास आणि तुमच्या अहंकाराला खतपाणी देण्यास तयार असतील तर अशा ठिकाणी तुम्ही खूप शांत असता. फक्त अशा जागी, जिथे तुमच्या अहंकाराला ठेच पोहोचते, तिथे तुम्ही अशांत असता.
साधारणपणे, या जगात माणसे जेव्हा मनाच्या शांतीबद्दल बोलत असतात, तेव्हा ते फक्त त्यांचा अहंकार कसा सुखावेल याविषयी बोलत असतात. अशांत स्थितीत राहण्यापेक्षा आरामशीर रहावे असे त्यांना वाटते. परंतु, अहंकार सुखावण्यासाठी तुम्ही जी प्रक्रिया अवलंबता तीच प्रक्रिया तुम्हाला अशांत देखील करते. मनुष्य शांत होण्यासाठी जितके जास्त प्रयत्न करतो, तितका अधिक शांती गमावतो आणि भरकटत जातो. जी व्यक्ती शांत होण्यासाठी प्रयत्न करते आहे ती खरेतर कधीच शांत होऊ शकणार नाही. अगदी याच्या उलट घडेल.
साधारणपणे, तुम्ही शांती मिळवता म्हणजे फक्त स्वतःला आरामदायी बनवता. जेव्हा तुम्ही पर्वताकडे बघता तेव्हा तुम्ही शांत असता. पण जंगलातून अचानक एखादा हत्ती तुमच्या दिशेने धावत आला तर तुमची सर्व शांती गायब होते. या शांतीला फारसा अर्थ नाही. यापेक्षा अशांत राहिलेले बरे, कारण तुम्ही अशांत असाल तर निदान तुम्ही
शोध तरी घ्याल. पण शांतीविषयीची चुकीची समजूत तुम्हाला फक्त आत्मसंतुष्ट बनवते. अशांतता तुमचा शत्रू नाही. तुमची आत्मसंतुष्टता तुमचा सर्वांत मोठा शत्रू आहे. काही साध्य केले तरी सुद्धा त्यातून शांती मिळते. जेव्हा तुम्ही काही साध्य केलेले असते, तेव्हा तुम्हाला खूप समाधानी वाटते. तुम्हाला सर्वस्व मिळाल्यासारखे वाटते. हे सुद्धा थोडा काळच टिकते. ही पूर्णत्वाची भावना म्हणजे खरे पूर्णत्व नाही. जेव्हा तुमच्या इच्छा किंवा आकांक्षा पूर्ण होतात, किंवा सर्व काही ठीक चालू असते, तुमच्या अवतीभोवतीची परिस्थिती, तुमचे शरीर आणि तुमचा अहंकार, दोन्हीसाठी सुखावह असते, अशावेळी तुम्ही शांती
अनुभवता. पण ही शांती, खरी शांती नाही. शांती म्हणजे शून्यत्व. शांती तुम्ही निर्माण करू शकत नाही; शांती म्हणजे कुठली घडून येणारी गोष्ट नाही. शांती म्हणजे ज्याचे अस्तित्व सतत आहे. पृष्टभागावर जे घडत असते, ती अशांतता असते. हे अगदी एखाद्या महासागरासारखे आहे. महासागराच्या पृष्टभागावर तुम्ही लाटा बघता, प्रचंड खळबळ आणि कल्लोळ चाललेला असतो. परंतु तुम्ही खोलवर गेलात तर तिथे पूर्ण शांती असते. शांती, हा अस्तित्वाचा मूळ स्वभाव आहे.

- सद् गुरू
(ईशा फाऊंडेशन)