श्रेयस अय्यर : क्रिकेटमधील ‘फिनिक्स’

Story: क्रीडारंग |
20th April, 09:24 pm
श्रेयस अय्यर : क्रिकेटमधील ‘फिनिक्स’

भारतीय क्रिकेटमधील सध्याचे ‘चलनी नाणे’ असलेला श्रेयस अय्यर याचा प्रवास एका ‘रोलरकोस्टर राईड’पेक्षा कमी नाही आहे. एका बाजूला अफाट यश आणि दुसरीकडे अपमानकारक डच्चू अशा टोकाच्या अनुभवातून जात श्रेयसने आज स्वतःला सिद्ध केले आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याने पकडलेला ‘अशक्यप्राय’ झेल असो किंवा पंजाब किंग्जचा कर्णधार म्हणून त्याची तळपती बॅट; श्रेयसने आपल्या टीकेला आपल्या कामगिरीनेच उत्तर दिले आहे. त्याने फिनिक्स पक्षाप्रमाणे घेतलेली झेप अचंबित करणारी आहे.

श्रेयसच्या आयुष्यात २०२४ ची सुरुवात अत्यंत कठीण राहिली. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले होते की, राष्ट्रीय संघात नसताना खेळाडूंनी स्थानिक क्रिकेटला प्राधान्य देणे अनिवार्य आहे. मात्र, रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबई आणि बडोदा संघ आमनेसामने असताना श्रेयसने पाठीच्या दुखापतीचे कारण सांगून विश्रांती घेतली. येथेच वादाला सुरुवात झाली. नॅशनल क्रिकेट अकादमीतील वैद्यकीय प्रमुख नितीन पटेल यांनी बीसीसीआयला दिलेल्या अहवालात म्हटले की, श्रेयस पूर्णपणे फिट आहे. या परस्परविरोधी विधानांमुळे बीसीसीआयने कठोर पाऊल उचलले आणि श्रेयससह इशान किशनला वार्षिक करारातून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे त्याला संंघातूनही वगळण्यात आले.

करारातून बाहेर पडल्यानंतर श्रेयस खचला नाही. २०२४ च्या आयपीएल हंगामात त्याने कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व केले. २०२३ चा हंगाम दुखापतीमुळे मुकल्यानंतर श्रेयसवर मोठी जबाबदारी होती. त्याने केवळ संघ बांधणी केली नाही, तर खेळाडूंमध्ये विजयाचा विश्वास निर्माण केला. त्याच्या नेतृत्वाखाली कोलकात्याने तब्बल १० वर्षांनंतर आयपीएलच्या जेतेपदावर नाव कोरले. वैयक्तिक कामगिरीतही श्रेयसने ३५१ धावा कुटून आपला फॉर्म सिद्ध केला.

ज्या कर्णधाराने १० वर्षांनंतर ट्रॉफी मिळवून दिली, तोच कर्णधार पुढील हंगामात संघात नाही, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र, २०२५ च्या मेगा ऑक्शनपूर्वी कोलकाताने श्रेयसला रिटेन (राखून ठेवणे) केले नाही. केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी सांगितले की, श्रेयसला स्वतःची ‘मार्केट व्हॅल्यू’ तपासायची होती आणि म्हणूनच त्याने लिलावात जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय श्रेयससाठी जुगार होता, पण त्याचा हा ‘रिस्क’ यशस्वी ठरला. 

लिलावात श्रेयस अय्यरसाठी लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात मोठी चढाओढ पाहायला मिळाली. अखेर पंजाब किंग्जने २६.७५ कोटी रुपयांची विक्रमी बोली लावून त्याला आपल्या संघात घेतले. आयपीएल इतिहासातील ही दुसरी सर्वात मोठी बोली ठरली. या एका बोलीने श्रेयसची जागतिक क्रिकेटमधील किंमत आणि दबदबा अधोरेखित केला. सध्या तो दबदबा आपल्याला मैदानात दिसत आहे. अय्यरचा संघ गुणतालिक अव्वल स्थानी विराजमान असून स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

- प्रवीण साठे