सापाच्या अनेक दंशांनंतरही श्वान मागे हटला नाही; चिमुरड्यांचे प्राण वाचवले. कृतज्ञ गावकऱ्यांनी काढली अंत्ययात्रा.

भुवनेश्वर: माणूस आणि कुत्रा यांच्यातील नाते हे हजारो वर्षांपासून विश्वासाचे आणि निष्ठेचे मानले जाते. या नात्याला साजेसा आणि अंगावर शहारे आणणारी घटना ओडिशामधील मयूरभंज जिल्ह्यात घडली आहे. बालवाडीत शिरणाऱ्या एका अतिविषारी सापाशी झुंज देत 'काली' नावाच्या श्वानाने ३० चिमुरड्यांचे प्राण वाचवले. दुर्दैवाने, यात सापाने अनेक ठिकाणी दंश केल्यामुळे या मूक प्राण्याला वीरमरण आले. कालीच्या या अतुलनीय धाडसामुळे संपूर्ण गाव भावुक झाला. सोशल मीडियावरही त्याच्या शौर्याचे कौतुक होत आहे.
मयूरभंज जिल्ह्यातील एका छोट्या गावात ही घटना घडली. नेहमीप्रमाणे गावातील बालवाडीत सुमारे ३० लहान मुले खेळण्यात दंग होती. याच दरम्यान एक विषारी साप बालवाडीच्या दिशेने सरपटत येऊ लागला. मुले आपल्याच विश्वात खेळत असल्याने त्यांना समोरून येणाऱ्या या मृत्यूच्या संकटाची पुसटशी कल्पनाही नव्हती. मात्र, तिथेच असलेल्या काली नावाच्या श्वानाने हे संकट ओळखले आणि कोणत्याही परिणामाची पर्वा न करता तो थेट सापावर तुटून पडला.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, कालीने सापाला बालवाडीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. साप आणि काली यांच्यात जोरदार झटापट सुरू झाली. सापाने कालीच्या चेहऱ्यावर आणि तोंडावर अनेक ठिकाणी दंश केले, मात्र तरीही हा शूर श्वान मागे हटला नाही. त्याने आपला संघर्ष सुरूच ठेवला. अखेर, कालीच्या हल्ल्यात साप जागीच ठार झाला. पण तोपर्यंत सापाचे विष कालीच्या पूर्ण शरीरात पसरले होते. साप मेल्याची खात्री पटल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच काली जमिनीवर कोसळला आणि त्याने आपला शेवटचा श्वास घेतला.
ज्या मुलांचे प्राण वाचले, त्या पालकांसाठी काली हा केवळ एक प्राणी नसून प्रत्यक्ष देवदूत ठरला. ज्या काळात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या बातम्या वारंवार येत आहेत, अशा वेळी कालीने दाखवलेली ही निस्पृह सेवा माणुसकीला आणि प्राणीप्रेमाला एक नवी दिशा देणारी ठरली आहे.
कालीच्या या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. कालीचे पार्थिव फुलांनी सजवण्यात आले आणि त्याची भव्य अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात त्यावेळी पाणी होते. या शूर श्वानाच्या बलिदानाची कथा आता सर्वत्र पसरत असून, प्राण्यांमधील ही अफाट निष्ठा पाहून समाज नतमस्तक होत आहे.