तर होर्मुझ सामुद्रधुनी जहाज वाहतुकीसाठी खुली

तेहरान/वॉशिंग्टन/बेरूत : पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत असतानाच इराणने युद्ध अद्याप संपले नसल्याचा ठाम दावा केला आहे. शस्त्रसंधी अस्तित्वात असतानाही लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
इराणचे उपसंरक्षण मंत्री ब्रिगेडियर जनरल रेझा तलाएई निक यांनी स्पष्ट केले की, अमेरिका आणि इस्रायलने आक्रमक कारवाया थांबवल्यानंतरच होर्मुझ सामुद्रधुनी जहाज वाहतुकीसाठी खुली करण्यात येईल. इराणच्या सुरक्षेला बाधा न आणणाऱ्या अटींचे पालन झाल्यासच व्यापारी जहाजांना मार्ग मोकळा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
इराणी लष्करानेही पश्चिम आशियातील संघर्षाला “युद्ध” असेच संबोधत, होर्मुझ सामुद्रधुनीवर (Strait of Hormuz) पूर्ण नियंत्रण असल्याचा दावा केला आहे. लष्कराने आपली सज्जता कायम ठेवली असून; नव्या लक्ष्यांनुसार रणनीती आखली जात असल्याचे सरकारी माध्यमांनी नमूद केले आहे.
दरम्यान, अमेरिकेचे (USA) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ब्रिटनचे राजा किंग चार्ल्स तिसरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत इराणने (Iran) अण्वस्त्र (Nuclear weapon) प्राप्त करू नयेत, यावर एकमत असल्याचे सांगितले. अमेरिकन काँग्रेसला संबोधित करताना किंग चार्ल्स यांनी जागतिक अस्थिरतेवर भाष्य करत पश्चिमी देशांनी एकजूट ठेवण्याचे आवाहन केले.
ट्रम्प यांनी इराणची स्थिती “कोसळण्याच्या मार्गावर” असल्याचा दावा करत तेहरानकडून आलेल्या प्रस्तावावर नाराजी व्यक्त केली. इराणने अणुकार्यक्रमावरील चर्चा युद्धानंतर करण्याचा प्रस्ताव दिला असला तरी, अमेरिका सुरूवातीपासूनच हा मुद्दा निकाली काढण्याच्या भूमिकेवर ठाम आहे.
लेबनॉनमध्ये परिस्थिती चिघळली
लेबनॉनमध्ये मात्र परिस्थिती अधिक चिघळली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, दक्षिण भागात इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून; काही सैनिक जखमी झाले आहेत. एप्रिलमध्ये जाहीर झालेल्या शस्त्रसंधीनंतरही इस्रायल-हिझबुल्ला संघर्ष सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
अमेरिका इराणची आर्थिक नाकेबंदी सुरू ठेवणार
दरम्यान, अमेरिकेकडून इराणविरोधातील आर्थिक नाकेबंदी दीर्घकाळ सुरू ठेवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इराणच्या तेल निर्यातीवर मर्यादा आणत समुद्री वाहतुकीवर निर्बंध घालण्याची रणनीती ट्रम्प प्रशासनाच्या विचाराधीन असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.