महिलांच्या बँक ठेवीत वर्षभरात २ हजार कोटींची वाढ

राज्यातील चित्र : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या महिलांची संख्याही वाढली

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th April, 11:49 pm
महिलांच्या बँक ठेवीत वर्षभरात २ हजार कोटींची वाढ

पणजी : बदलता काळ आणि गुंतवणुकीच्या नवनवीन पर्यायांच्या युगातही गोव्यातील महिलांनी बचतीचा आणि गुंतवणुकीचा वारसा अधिक सक्षमपणे जपला आहे. केंद्रीय सांख्यिकी खात्याने प्रसिद्ध केलेल्या ‘भारतातील महिला आणि पुरुष २०२५’ या अहवालानुसार, गेल्या एका वर्षात गोव्यातील महिलांच्या बँक ठेवींमध्ये तब्बल २,४५४ कोटी रुपयांची मोठी वाढ झाली आहे. केवळ बँकाच नव्हे, तर शेअर बाजारासारख्या जोखमीच्या क्षेत्रातही महिलांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून येत आहे.
अहवालानुसार, ३१ मार्च २०२४ अखेरीस राज्यातील विविध बँकांमध्ये महिलांच्या नावे २३.४५ लाख खाती होती, ज्यामध्ये २६,७४३ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. अवघ्या एका वर्षात, म्हणजेच ३१ मार्च २०२५ पर्यंत महिलांच्या बँक खात्यांची संख्या २३.९५ लाखांवर पोहोचली असून, त्यातील एकूण ठेवी २९,१९७ कोटी रुपयांपर्यंत वाढल्या आहेत.
याउलट, पुरुषांच्या बँक खात्यांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मार्च २०२४ मध्ये पुरुषांची ३४.०१ लाख खाती होती, जी मार्च २०२५ मध्ये कमी होऊन ३३.९० लाख झाली आहेत. मात्र, संख्या कमी झाली असली तरी पुरुषांच्या ठेवी ३६,१४२ कोटींवरून वाढून ३८,९३९ कोटींवर पोहोचल्या आहेत.
शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या 'डिमॅट' खात्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या महिलांचे गोव्यातील प्रमाण ३३ टक्के इतके असून हे देशात सर्वाधिक आहे. याची राष्ट्रीय सरासरी केवळ २४.९ टक्के आहे. ३१ मार्च २०२१ रोजी गोव्यात केवळ १७,१५० महिलांची डिमॅट खाती होती. ३१ मार्च २०२५ पर्यंत ही संख्या वाढून ७७,१९४ झाली आहे. मिझोरम, आसाम या राज्यांत महिला गुंतवणूकदारांचे प्रमाण अधिक तर बिहार, उत्तर प्रदेशमध्ये कमी होते.
गुंतवणुकीच्या बदलत्या पद्धती
मागील काही वर्षांत पारंपरिक गुंतवणुकीसोबतच गोव्यातील लोक आता शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि डिमॅट खात्यांकडे वळत आहेत. राज्यातील एकूण डिमॅट खात्यांची संख्या आता २.८६ लाखांवर पोहोचली आहे. त्यामध्ये २.०९ लाख पुरुषांची आणि ७७ हजारहून अधिक महिलांची खाती आहेत. एका वर्षात महिलांच्या डिमॅट खात्यांमध्ये ७ टक्क्यांनी वाढ होणे, हे महिलांच्या वाढत्या आर्थिक साक्षरतेचे प्रतीक मानले जात आहे.      

हेही वाचा