'हातकातरो खांबा’चा उगम, इतिहासाचा सखोल अभ्यास होणे आवश्यक !

संशोधन प्रस्तावाला इतिहासअभ्यासकांचा पाठिंबा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th April, 11:41 pm
'हातकातरो खांबा’चा उगम, इतिहासाचा सखोल अभ्यास होणे आवश्यक !

पणजी : हातकातरो खांबाचा उगम, त्याचा खरा इतिहास तसेच नावाबाबत सखोल संशोधन होणे आवश्यक असल्याची मागणी इतिहासतज्ञांकडून करण्यात आली आहे. अशा अभ्यासातून अनेक नव्या ऐतिहासिक बाबी समोर येऊ शकतात, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. इतिहासाबाबत रस असलेल्या नागरिकांनीही या संशोधन प्रस्तावाचे स्वागत केले आहे.
जुन्या गोवेमधील या ऐतिहासिक खांबाला लोकप्रचलित भाषेत ‘हातकातरो खांब’ म्हटले जाते. मात्र या स्मारकाचे मूळ नाव ‘पेलोरिन्हो नोवो’ असल्याचे सांगितले जाते. या संदर्भात आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांनी ‘हातकातरो खांब’ या नावावर हरकत घेतली आहे. इतिहास अभ्यासक रोहित फळगावकर यांनी सांगितले की, अॅड. फेरेरा यांचा मुद्दा योग्य आहे. अनेकदा उत्खनन आणि संशोधनानंतर नव्या ऐतिहासिक गोष्टी समोर येतात. त्यामुळे या खांबाच्या नावासह त्याच्या इतिहासावरही अभ्यास होणे गरजेचे आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर हातकातरो खांबाच्या इतिहासाचा, वास्तुशैलीचा आणि मूळ नावाचा सखोल अभ्यास करण्याची गरज इतिहास अभ्यासकांनी अधोरेखित केली आहे. अशा संशोधनातून गोव्याच्या वारशातील महत्त्वाचे पैलू उजेडात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मंदिराचा खांब असण्याची शक्यता
इतिहास अभ्यासक सचिन मदगे यांनी सांगितले की, हातकातरो खांबाच्या बांधकामशैलीकडे पाहिल्यास तो मंदिरातील खांबासारखा दिसतो. पोर्तुगीज राजवटीपूर्वी तो एखाद्या देवळाचा खांब असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर हा खांब पूर्वी मंदिराचा भाग असल्याचे सिद्ध झाले, तर त्याला ‘हातकातरो खांब’ हे नाव देणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा