मंत्रिपदासह आगामी निवडणुकीबाबत केंद्रीय नेत्यांशी होणार चर्चा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : रवी नाईक यांच्या निधनामुळे रिक्त झालेले मंत्रिपद, आगामी विधानसभा निवडणूक, तसेच राजकीय स्थितीबाबत केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक बुधवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. त्यांची गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन व पक्षाचे सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्याशी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाचा निर्णय बैठकीत होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
रवी नाईक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ९ एप्रिल रोजी निवडणूक होणार होती. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन प्रचार संपल्यानंतर मतदानाच्या आदल्या दिवशी पोटनिवडणूक रद्द करण्याचा निवाडा उच्च न्यायालयाने दिला. यामुळे फोंडा मतदारसंघाची जागा आगामी निवडणुकीपर्यंत रिक्त राहण्याचीच शक्यता आहे. मंत्रिमंडळात सध्या एक जागा रिक्त आहे. फोंडा पोटनिवडणूक निकालानंतर ही जागा भरली जाणार होती. आता फोंडा पोटनिवडणूक रद्द झाल्याने विधानसभेत ३९ आमदार राहणार आहेत. रिक्त मंत्रिपदावर कोणाची वर्णी लावावी, असा प्रश्न आहे. पोटनिवडणुकीत विजयी झाल्यास रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांचीच वर्णी लागली असती. आता रितेश नाईक यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तर सहा महिन्यांच्या आता त्यांना निवडून यावे लागणार आहे. यासाठी ऑक्टोबरपर्यंत विधानसभा निवडणूक घ्यावी लागेल. अन्यथा रितेश नाईक यांचा मंत्रिमंडळात समावेश करणे शक्य होणार नाही.
बुधवारी मुख्यमंत्री दिवसभर विविध कार्यक्रमांमध्ये व्यस्त होते. रात्री वाहतूक खात्याच्या कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर लगेचच ते दिल्लीला रवाना झाले. प्रदेशाध्यक्षांसह त्यांच्या आकस्मिक दिल्ली भेटीत महत्त्वाचे निर्णय होणार आहेत.
मुदतपूर्व निवडणुकीबाबत चर्चा शक्य
मंत्रिमंडळातील रिक्त जागेवर कोणाचा समावेश करायचा यावर चर्चा होणार आहे. विधानसभेचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपणार असला तरी त्यापूर्वीच निवडणूक होणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे सध्या बरीच खाती आहेत. एका नवीन मंत्र्याचा समावेश करण्यासह खात्यातही बदल होणार आहे. मुख्यमंत्र्यांकडील काही खाती अन्य मंत्र्यांना दिली जातील. याबाबत बैठकीत चर्चा केली जाणार आहे. 
आगामी विधानसभा निवडणूक तसेच राजकीय स्थितीची माहिती केंद्रीय नेतृत्वाला देण्यासाठी मुख्यमंत्री व मी दिल्लीत आलो आहे. शक्य झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीसुद्धा भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतर केंद्रीय मंत्र्यांचीही भेट घेण्याचा आमचा प्रयत्न असेल.
_ दामू नाईक, प्रदेशाध्यक्ष, भाजप