एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालात भाजपचे सरकार

केरळमध्ये सत्तापरिवर्तन : आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरीत सत्ताधाऱ्यांवर विश्वास


11 mins ago
एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालात भाजपचे सरकार

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान बुधवारी झाल्यानंतर पाच राज्यांच्या निवडणूक निकालांबाबतचा एक्झिट पोल जाहीर झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्तेत परिवर्तन होऊन भाजप सत्तेवर येईल, असा अंदाज पाचपैकी चार चाचण्यांत व्यक्त करण्यात आला आहे. १५ वर्षांची ममता बॅनर्जी यांची सत्ता हटवून भाजप विजयी होईल, असे सर्वेक्षणांतून दिसून येत आहे. केरळमध्ये काँग्रेसप्रणीत यूडीएफ सत्तेवर येईल, तर तामिळनाडूत द्रमुक सत्ता कायम राखेल. आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ४ मे रोजी पाचही राज्यांमध्ये निकाल जाहीर होणार आहेत.
पश्चिम बंगालमध्ये ‌‘पीपल्स पल्स‌’च्या सर्वेक्षणात तृणमूल ११० ते १८७ जागा मिळवून सत्तेवर कायम राहील, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. यात भाजपला ९५ ते १०० जागा मिळतील. तर, काँग्रेस आणि मार्क्सवादी काँग्रेससह अपक्षांना १ ते ४ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ‌‘पी. मार्क‌’च्या सर्वेक्षणात भाजप १५० ते १७५ जागा मिळवून सत्तेवर येईल, तर तृणमूल ११८ ते १३८ पर्यंत जागा मिळवू शकेल. अन्य २ ते ६ जागी विजयी होऊ शकतील, असा अंदाज आहे. ‌
‘चाणक्य स्ट्रॅटेजीस‌’च्या अंदाजानुसार, भाजप १५० ते १६० जागा जिंकून सत्ता मिळवेल, तर तृणमूल १३० ते १४० जागा मिळवून कडवी लढत देईल. अन्य उमेदवारांना ६ ते १० जागा मिळतील. ‌‘मॅट्रिझ‌’च्या दाव्यानुसार, तृणमूल १२५ ते १४० सदस्य निवडून आणू शकेल. भाजप १४६ ते १६१ जागा मिळवून सत्तेवर विराजमान होईल. अन्य ६ ते १० जागा मिळवतील. ‌‘एबीपी-सी व्होटर‌’नुसार, भाजपला १५० ते १७५ जागा, तर तृणमूलला ११८ ते १३८ जागा मिळतील. अन्य २ ते ६ जागांवर विजयी होतील.
आसाममध्ये पुन्हा ‌‘कमळ‌’
आसाममध्ये ‌‘पीपल्स पल्स‌’च्या सर्वेक्षणानुसार, भाजप ६८ ते ७२ जागांवर विजयी होईल. काँग्रेस २२ ते २६ जागांवर, तर तृणमूल आणि अपक्षांसह अन्य ११ ते १५ जागांवर विजयी होतील. ‌‘चाणक्य‌’नुसार, भाजप ८८ ते ९८, काँग्रेस २२ ते ३२, तर अन्य ३ ते ५ जागा मिळवू शकतात. ‌‘पी. मार्क‌’च्या अंदाजानुसार, भाजप ६५ ते ९६, तर काँग्रेस २५ ते ३२ आणि अन्य ६ ते १२ जागांवर विजयी होऊ शकतात.
केरळमध्ये सत्तांतर
केरळमध्ये निकाल चुरशीचे लागण्याची शक्यता असली, तरी सर्वच सर्वेक्षणांत काँग्रेसप्रणीत यूडीएफ सत्तेवर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ‌‘पीपल्स पल्स‌’नुसार, डाव्या पक्षांची एलडीएफ ५५ ते ६५, तर यूडीएफ ७५ ते ८५ जागा पटकावतील. अन्य ० ते ३ जागा मिळवतील. ‌‘अॅक्सिस‌’नुसार, यूडीएफ ७८ ते ९०, तर एलडीएफ ४९ ते ६२ आणि अन्य ० ते ३ जागा पटकावतील, असे मत व्यक्त केले आहे. ‌‘मॅट्रिझ‌’नुसार, एलडीएफ ६० ते ६५, तर यूडीएफ ७० ते ७५ आणि अन्य ५ ते ९ जागांवर विजयी होतील. ‌‘चाणक्य‌’नुसार, एलडीएफला ५६ ते ६४ आणि यूडीएफ ७२ ते ८० जागांवर विजयी होऊ शकेल. अन्य ३ ते ७ जागा मिळवू शकतील.
तामिळनाडूत द्रमुक आघाडीचा विजय निश्चित
तामिळनाडूत द्रमुक आघाडीचा विजय मोठ्या फरकाने होईल, असा अंदाज आहे. भाजपला सोबत घेणाऱ्या अण्णा द्रमुकचा पराभव होण्याची शक्यता वर्तवली आहे. ‌‘पीपल्स पल्स‌’नुसार, द्रमुक १२५ ते १४५ जागा, अण्णा द्रमुक ६५ ते ८० जागा पदरात पाडून घेऊ शकेल. अभिनेता विजयच्या पक्षासह अन्य २० ते ३० जागांवर विजयी होतील. ‌‘मॅट्रिझ‌’च्या अंदाजानुसार, द्रमुक १२२ ते १३२, अण्णा द्रमुक ८७ ते ११० आणि अन्य १० ते १८, तर ‌‘चाणक्य स्ट्रॅटेजीस‌’नुसार द्रमुक १४५ ते १६०, अण्णा द्रमुक ५० ते ६५ आणि अन्य १८ ते २६ जागांवर विजयी होतील, असा अंदाज आहे.