अटकेत असलेल्या गौतम खट्टरला जुलाबचा त्रास

म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचारार्थ दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th April, 11:44 pm
अटकेत असलेल्या गौतम खट्टरला जुलाबचा त्रास

म्हापसा : सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी गौतम खट्टर याची तब्येत बिघडल्याने त्याला म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात उपचारार्थ दाखल केले आहे. छातीत दुखणे, जुलाब व निर्जलीकरण अशा आजाराने खट्टर त्रस्त आहे.

मंगळवार, दि. २८ रोजी सायंकाळी खट्टर याने छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यावर पोलिसांनी त्याला तत्काळ इस्पितळात हलवले. आपतकालिन विभागात तपासणीनंतर त्याला इस्पितळातील प्रिझन वॉर्डमध्ये (बंदी विभाग) भरती करण्यात आले.

इस्पितळात उपचारासाठी आणलेल्या खट्टर याला पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्याने ‘हर हर महादेव, जय श्रीराम’ या घोषणा देत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

दरम्यान, वास्को येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा गौतम खट्टरवर कथित आरोप आहे. राज्यात या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर, वास्को पोलिसांकडून गुन्हा हस्तांतरित करत गुन्हा शाखेने संशयित आरोपी खट्टर याला २६ रोजी हिमाचल प्रदेशातून अटक केली होती.

वास्को न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर गुन्हा शाखेने संशयित खट्टर याला पर्वरीतील पोलीस कोठडीत ठेवले होते. तिथे मंगळवारी त्याने आपल्या प्रकृतीविषयी तक्रार केल्यावर त्याला जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. 

हेही वाचा