दोनापावला, सांतिनेज येथे कारवाई : १७ जणांना अटक, ९४.७० लाख किमतीचे साहित्य जप्त

पणजी : दोनापावला आणि सांतिनेज येथून अमेरिकन नागरिकांना कर्ज व इतर सुविधा देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोन बनावट काॅल सेंटरचा गुन्हा शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी गुन्हा शाखेने दोनापावला आणि सांतिनेझ या दोन ठिकाणी छापा टाकून सतरा जणांना अटक केली. त्यांच्याकडून ९४.७० लाख किमतीचे १५ लॅपटाॅप, २४ मोबाईल, ४ चारचाकी व इतर साहित्य जप्त केले.
सांतिनेझ येथील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटात काही संशयास्पद कारवाया होत असून तिथे अनेक युवक राहत असल्याची माहिती गुप्तहेरांकडून मिळाली होती. त्यानुसार, त्या ठिकाणी बनावट काॅल सेंटर सुरू असल्याची माहिती समोर आली. याची दखल घेऊन अधीक्षक राहुल गुप्ता आणि जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने बुधवार, २९ रोजी उत्तररात्री २ ते सकाळी ७.१० दरम्यान वरील ठिकाणी कारवाई केली. त्यावेळी पथकाने गुजरात येथील यश राजेश देसाई (२९), करण मला (२३) यांच्यासह सात जणांना ताब्यात घेतले. तर मीहिर देसाई आणि सज्जन हे दोघे फरार आहेत. त्यांच्याकडून ३० लाख किमतीचे ७ लॅपटाॅप, १३ मोबाईल, एक चारचाकी व इतर साहित्य जप्त केले. त्यानंतर या प्रकरणी वरील संशयितांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१९(२), ३१८ (४) ६१(२) आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६सी व ६६डी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.
याच दरम्यान दोनापावला परिसरातील एका बंगल्यात बनावट काॅल सेंटर सुरू असल्याची माहिती गुन्हा शाखेला मिळाली. त्यानुसार, अधीक्षक राहुल गुप्ता आणि जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मंगेश वळवईकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अमीन नाईक व इतर पथकाने बुधवार २९ रोजी पहाटे ५ ते दुपारी १२.१५ दरम्यान दोनापावला येथील सागर हाऊसिंग सोसायटीतील एका बंगल्यावर छापा टाकला. त्यावेळी गुन्हा शाखेने महिपालसिंग राठोड, शुभम देसाई यांच्यासह दहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६४.७० लाख किमतीचे ८ लॅपटाॅप, ११ मोबाईल, तीन चारचाकी व इतर साहित्य जप्त केले. त्यानंतर या प्रकरणी वरील संशयितांविरोधात भा. न्या. संहितेच्या कलम आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.
गिफ्ट कार्ड खरेदी करायला लावून फसवणूक
वरील दोन्ही टोळी बनावट काॅल सेंटर मार्फत कर्ज वितरण कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधत होते. त्यांना कर्ज आणि इन्स्टंट मनी देण्याचे आमिष दाखवत होते. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट कार्ड खरेदी करायला लावून फसवणूक करायचे असे समोर आले आहे.