सायबर छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या

बिजनोर : उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) बिजनोर जिल्ह्यातून सायबर गुन्हेगारीचे (Cyber crime) भयावह वास्तव समोर आले आहे. ‘डिजीटल अरेस्ट’च्या (Digital arrest) नावाखाली झालेल्या छळाला कंटाळून २८ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, अंत्यसंस्काराच्या वेळीच आलेल्या एका फोन कॉलमुळे या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला.
नेमकी घटना काय?
बिजनोरच्या फरीदपूर भोगी गावातील मोनिका हिने २७-२८ एप्रिलच्या रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या शेजारीच झोपलेल्या ८ आणि ११ वर्षांच्या मुलांना सकाळी हा प्रकार लक्षात आला. सामाजिक दबावामुळे कुटुंबीयांनी सुरूवातीला पोलिसांना माहिती न देता अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.
स्मशानातील फोनने उलगडले गूढ
मोनिकाच्या अंत्यसंस्कारावेळी तिचा मोबाईल वारंवार वाजू लागला. पुतण्याने फोन उचलला असता, समोर पोलीस गणवेशातील व्यक्ती व्हिडिओ कॉलवर दिसली. स्वतःला ‘क्राईम ब्रांच’ अधिकारी सांगत त्या व्यक्तीने मोनिकाशी बोलण्याचा आग्रह धरला आणि धमक्या द्यायला सुरुवात केली. मृत्यूची माहिती दिल्यानंतरही भामट्याने तिच्या पतीलाही तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. यामुळे कुटुंबीयांना संशय आला आणि त्यांनी अधिक तपास सुरू केला.
सुसाईड नोटमधून उघड झाला छळ
घराची झडती घेतली असता मोनिकाची डायरी सापडली. त्यात लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने अज्ञात व्यक्तींनी सतत फोन करून धमकावल्याचे आणि ब्लॅकमेल केल्याचे नमूद केले होते. तपासात तिच्या फोनवर विविध नंबरवरून व्हॉट्सॲप कॉल्स व मेसेज आल्याचे आढळले.
भामट्यांनी तिला अमली पदार्थांच्या तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यात अडकवल्याचा खोटा आरोप करून ‘डिजीटल अरेस्ट’मध्ये ठेवले होते. तिला २४ तास कॅमेऱ्यासमोर राहण्यास भाग पाडले जात होते आणि मोठी रक्कम देण्याची मागणी केली जात होती. मोनिकाच्या पतीने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, संबंधित टोळीचा शोध सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
‘डिजिटल अरेस्ट’ची भयाणता
२०२४ मध्ये देशभरात ‘डिजीटल अरेस्ट’च्या १,२३,६७२ घटना नोंदवल्या गेल्या. २०२५ मध्ये हे प्रमाण ८६ टक्क्यांनी घटून १७,२६४ वर आले असले तरी, नागरिकांना तब्बल ६४४ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. कर्नाटकात सर्वाधिक ३४६ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
पोलिसांचे आवाहन
कोणताही पोलीस अधिकारी व्हिडिओ कॉलद्वारे अटक करत नाही किंवा पैशांची मागणी करत नाही.अशा प्रकारचा कॉल आल्यास घाबरून न जाता तात्काळ सायबर हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधावा. ही घटना केवळ एक गुन्हा नसून, डिजिटल युगातील वाढत्या सायबर दहशतीचे भीषण चित्र उभे करते. जागरूकता आणि सतर्कता हाच अशा फसवणुकीपासून बचावाचा एकमेव मार्ग आहे.