बारगी जलाशय दुर्घटना

जबलपूर : मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) जबलपूर जिल्ह्यातील (Jabalpur District) बारगी धरणाच्या जलाशयात घडलेल्या भीषण बोट दुर्घटनेने (Bargi Dam cruise tragedy)) संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या दुर्घटनेत मृत पावलेल्यांचे ह्रदय पिळवटून टाकणारे किस्से सध्या पुढे येत आहेत. शोध मोहिमेत मातेच्या मिठीत घट्ट विसावलेल्या एका चिमुकल्यासहीत दोन मृतदेह बाहेर काढले. आणि हे चित्र पाहून अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला.
ह्रदय हेलावून टाकणाऱ्या या दृष्याची छायाचित्रे सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. कितीही संकटात असली तरी माता आपल्या मुलांना सोडू शकत नाही, याचे जीवंत उदाहरण म्हणजे हे दृष्य असल्याच्य प्रतिक्रिया उमटत आहेत. गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळामुळे प्रवाशांनी भरलेली ‘रिव्हर क्रूझ’ बोट उलटून होत्याचे नव्हते झाले. या दुर्घटनेत नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर १० ते १२ जण बेपत्ता होते.
या दुर्घटनेतील सर्वात हृदयद्रावक क्षण आई आणि तिच्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा होता. बचाव पथकाने आई आणि तिच्या चार वर्षांच्या मुलाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. दोघेही शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांना घट्ट मिठी मारून होते. हे दृश्य पाहून घटनास्थळी उपस्थित कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. आणि उपस्थित असलेल्या अनेकांना आपले अश्रू आवरणे कठीण झाले.
मृत महिलेच्या आणि तिच्या लहानग्या मुलाच्या अंगावर ‘लाईफ जॅकेट्स’ बांधलेले तसेच होते. मात्र तरीही त्यांना वाचवता आले नाही. या हृदयद्रावक घटनेने घटनास्थळी भेट देणारे मंत्री राकेश सिंह यांनाही अश्रू अनावर झाले.
वादळाच्या तडाख्यात बोट उलटली
गुरुवारी घटनेच्या वेळी बोटीत सुमारे ३५ ते ४० प्रवासी होते. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार वारे वाहू लागले. जलाशयातील पाणी खवळले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, प्रवाशांनी आरडाओरडा करत बोट किनाऱ्यावर नेण्याची विनंती केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने बोट पुढे जाऊन उलटली.
२२ जणांना सुखरूप वाचवले
या दुर्घटनेत आतापर्यंत २२ जणांना सुखरूप वाचवण्यात आले आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), स्थानिक पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक नागरिकांनीही दोऱ्यांच्या साहाय्याने काही प्रवाशांना वाचवण्यास मदत केली.
सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
दुर्घटनेतून बचावलेल्या एका प्रवाशाने गंभीर आरोप करत सांगितले की, सर्व प्रवाशांना लाईफ जॅकेट्स देण्यात आले नव्हते. त्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.