गौतम खट्टरला वास्को न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

सेंट फ्रान्सिस झेवियर आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
1 hours ago
गौतम खट्टरला वास्को न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

वास्को : वास्को येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप असलेले गौतम खट्टर यांना अखेर वास्को प्रथमवर्ग न्यायालयाने (JMFC) सशर्त जामीन मंजूर केला आहे.

खट्टर यांच्या जामीन अर्जावरील निकाल आज सकाळच्या सत्रात अपेक्षित होता, मात्र न्यायालयाने तो राखून ठेवत दुपारी २:३० वाजता जाहीर केला जाईल असे स्पष्ट केले होते. सकाळपासूनच न्यायालय परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळाली. अखेर दुपारी २:३० वाजता न्यायालयाने आपला निर्णय जाहीर करत गौतम खट्टरला जामीन मंजुर केला.

या प्रकरणात गौतम खट्टर यांच्यातर्फे ॲड. अमेय प्रभुदेसाई यांनी न्यायालयात बाजू मांडली. दरम्यान खट्टर आरोग्याच्या समस्यांमुळे बांबोळी येथील गोवा वैद्यकीय  महाविद्यालयाच्या इस्पितळात  (GMC) उपचार घेत होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर करणे शक्य झाले नाही.  त्यामुळे  त्यांची न्यायालयीन प्रक्रिया व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून इस्पितळातूनच पार पडली.

वास्को येथील एका कार्यक्रमादरम्यान खट्टर यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते, ज्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. या विधानामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना १५ हजार रुपयांची दोन हमिदार, न्यायालयाच्या परवानगीशिवाय परदेशात जाण्यास मज्जाव केला व इतर काही अटी घातल्या आहेत.

हेही वाचा