
नवी दिल्ली : पूर्व दिल्लीतील उच्चभ्रू वस्ती असलेल्या विवेक विहार फेज-१ मध्ये पहाटे एका चार मजली इमारतीला भीषण आग लागली. या आगीत दोन कुटुंबांतील सदस्यांसह एकूण ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य काही जण गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे सर्वजण गाढ झोपेत असताना ही घटना घडल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ३:१५ च्या सुमारास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागली. काही वेळातच या आगीने रौद्र रूप धारण केले आणि धुराचे लोट तिसऱ्या व चौथ्या मजल्यापर्यंत पसरले. अग्निशमन दलाला पहाटे ३:४८ च्या सुमारास पाचारण करण्यात आले. त्यानंतर तात्काळ १४ अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर कंडिशनिंग युनिटमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर आगीचा भडका उडाला. इमारतीतून धूर बाहेर येत असल्याचे पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी बाल्कनीच्या माध्यमातून सुमारे १५ ते २० जणांना सुखरूप बाहेर काढले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
#WATCH | Delhi: Deputy Commissioner of Police (DCP) for Shahdara District, Rajendra Prasad Meena, says, "Fire broke out in a house in a four-story building in Vivek Vihar, with casualties on the second floor. So far, 3-4 bodies have been found, and the search for the remaining… https://t.co/JXCQ0AMEls pic.twitter.com/ohduLZbMeG
— ANI (@ANI) May 3, 2026
शहादरा जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त राजेंद्र प्रसाद मीणा यांनी सांगितले की, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सर्वाधिक जीवितहानी झाली आहे. आतापर्यंत ९ मृतदेह हाती आले असून शोधमोहीम अजूनही सुरू आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून सध्या कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत असून मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, स्थानिक पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभाग घटनास्थळी तपास करत आहेत. दरम्यान आगीचे नेमके कारण काय, याची चौकशी सुरू आहे. पहाटेच्या वेळी घडलेल्या या भीषण घटनेमुळे संपूर्ण दिल्लीत हळहळ व्यक्त केली जात आहे.