शिरगावच्या देवी लईराईच्या जत्रेतील दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण

त्या भयानक रात्रीचे दुःख आजही कायम

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
32 mins ago
शिरगावच्या देवी लईराईच्या जत्रेतील दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण

पणजी : आज, ३ मे २०२६ रोजी गोव्यातील शिरगाव येथील प्रसिद्ध लईराई देवीच्या जत्रेत घडलेल्या भीषण चेंगराचेंगरीच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. २ मे २०२५ च्या रात्री आणि ३ मे २०२५ च्या पहाटेच्या सुमारास घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण गोव्याला हादरवून सोडले होते. या घटनेत सहा भाविकांचा मृत्यू झाला होता, तर ७० हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. एका क्षणात घडलेल्या या दुर्घटनेमुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आज या घटनेत मृत्यू पावलेल्या मृतांच्या आठवणींना उजाळा देत, संपूर्ण राज्य हळहळ व्यक्त करत आहे.



घटना कशी घडली?

३ मे २०२५ रोजी पहाटे ३ च्या सुमारास जत्रेत सुमारे २ लाख भाविकांची प्रचंड उपस्थिती होती. होमकुंडाकडे जाणाऱ्या उतार असलेल्या मार्गावर अचानक चेंगराचेंगरी झाली. सुरुवातीला दोघेजण जमिनीवर पडले आणि त्यानंतर मागून येणाऱ्या भाविकांचा लोंढा त्यांच्यावर कोसळत गेला. या गर्दीमुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांवर धोंड भाविक कोसळले. दुकानांना वीज पुरवठा करणाऱ्या वायर तुटल्यामुळे काहींना विजेचा धक्का बसल्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. काही भाविक कोयते आणि इतर अवजारे विकणाऱ्या दुकानांवर पडल्यामुळेही गंभीर जखमी झाले. 




या चेंगराचेंगरीच्या घटनेमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता. सुर्या मयेकर (साखळी), आदित्य कवठणकर (वय १७, अवचीतवाडो-थिवी), तनुजा कवठणकर (वय ५२, अवचीतवाडो-थिवी), यशवंत केरकर (वय ४०, माडेल, थिवी), प्रतिभा कळंगुटकर (कुंभारजुवे), सागर नंदरगे (वय ३०, माठवाडा, पिळगाव) अशी त्यांची नावे आहेत. 


जखमींवर गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) आणि उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


सागरच्या आठवणीत सुन्न झालेली मने

शिरगावात पवित्र तळीवर स्नान करून मुड्डी येथे जाऊन देवीचा कौल घेतल्यानंतर आमचे धोंडगण उभे रांगेत होते. त्या वेळी घडलेली घटना सर्वात भयानक होती. त्या उतारावर पोहोचताच एक मोठा आवाज झाला. काय झाले ते कोणालाच समजेना. नंतर पाहण्याचा प्रयत्न केला असता, सागर नंदरगे हा आमच्या गटातील धोंडगण चेंगराचेंगरीत अडकला आणि तो बाहेर येऊच शकला नाही. माठवाडा-पिळगाव, डिचोली येथील धोंडगण धाकु बांदोडकर आणि सुशांत जल्मी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले. 



त्यांनी पुढे सांगितले की, जेव्हा आम्ही व्रतस्थ राहिलो, असा एकही क्षण गेला नाही जेव्हा सांगरची आठवण आली नाही. दरवर्षी या सोवळे व्रताच्या अंतिम किंवा आदल्या रात्री गावातील लोकांकडून दिंडी घातली जाते, मात्र सागरच्या निधनाचे दुःख लक्षात घेऊन यावर्षी दिंडीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.



त्या घटनेनंतर सांगरची आई घरातून कधी बाहेर पडलीच नाही.. 

सागर नंदरगे याची आई डिचोली बाजारात भाजी, फळे व इतर सामान विकून कुटुंबाचा चरितार्थ चालवत होती, तर सागर एका सहकारी संस्थेत काम करत होता. एकुलत्या एका मुलाच्या अकाली निधनाचा धक्का ती सहन करू शकली नाही. त्या दिवसापासून तिने स्वतःला घरात कोंडून घेतले आहे आणि बाहेर जाणे पूर्णपणे सोडून दिले आहे. या घटनेने तिच्या आयुष्यातील सर्व आनंद हिरावून घेतला आहे.



धोंडगणांचे आवाहन आणि प्रशासकीय खबरदारी

या घटनेच्या पार्श्वभूमीवर, धोंडगण सुशांत जल्मी यांनी भाविकांना आणि प्रशासनाला एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. ते म्हणाले, 'देवीच्या कार्यक्रमात किंवा कालोत्सवात-जत्रोत्सवात मानापमान किंवा तत्सम किरकोळ कारणांवरून होणारे वाद टाळता आले पाहिजेत. धोंडगणांमध्येही संयम आणि जबाबदारी असणे अत्यंत गरजेचे आहे. गेल्या वर्षी आपल्यावर कोसळलेले दुःख भविष्यात पुन्हा कोणावरही येऊ नये. यासाठी सरकारने आणि प्रशासनाने आखलेल्या नियमांचे व अटींचे सर्वांनी पालन केले पाहिजे.


श्री लैराई जत्रा दरवर्षी एप्रिल किंवा मे महिन्यात गोव्यातील शिरगाव येथे भरते.


या वर्षीच्या जत्रोत्सवात प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली. चेंगराचेंगरीसारखी घटना पुन्हा घडू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त आणि गर्दीच्या नियोजनावर विशेष भर देण्यात आला होता. ही घटना केवळ एक अपघात नसून, ती आपल्याला सुरक्षेच्या नियमांची आणि संयमाची आठवण करून देते. मृतांच्या आत्म्याला शांती मिळो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच प्रार्थना. 

हेही वाचा