कळंगुट किनारी सर्वाधिक घटनांची नोंद : मद्यधुंद पर्यटकांनी फेकलेल्या बाटल्यांचा स्थानिकांसह पर्यटकांना फटका

समीप नार्वेकर
पणजी : गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर सध्या काचेच्या बाटल्यांचे तुकडे टोचून जखमी होणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ‘दृष्टी मरीन’ या जीवरक्षक संस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत अशा १२ गंभीर घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये देशी पर्यटकांना सर्वाधिक दुखापत झाली असून, कळंगुट समुद्रकिनारा सर्वात जास्त असुरक्षित ठरत असल्याचे दिसून येत आहे.
दृष्टी जीवरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्रकिनाऱ्यावर फिरताना किंवा पाण्यात पोहताना काच टोचण्याच्या सर्वाधिक ५ घटना एकट्या कळंगुटमध्ये घडल्या आहेत. त्याखालोखाल कांदोळी येथे २, तर पाटणे, बाणावली, मोबोर, बागा आणि कोलवा किनाऱ्यावर प्रत्येकी एका घटनेची नोंद झाली आहे. जखमी झालेल्या पर्यटकांमध्ये ९ देशी, तर ३ विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. सर्व जखमींवर दृश्टीच्या जीवरक्षकांनी प्राथमिक उपचार केले.समुद्रकिनाऱ्यावर मद्यपान करण्यास आणि बाटल्या नेण्यास बंदी असतानाही, अनेक पर्यटक चोरून मद्यपान करतात आणि रिकाम्या बाटल्या वाळूत किंवा पाण्यात फेकतात. लाटांमुळे या बाटल्या फुटतात आणि त्यांचे टोकदार तुकडे वाळूत गाडले जातात, जे पर्यटकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. वाढत्या घटनांमुळे आता किनाऱ्यांवरील स्वच्छतेचा आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
महत्त्वाच्या काही घटना
३ जानेवारी : एका परदेशी पर्यटकाला २ फूट पाण्यात असताना पायाला खोल काच लागली.
१८ जानेवारी (कांदोळी) : कझाकस्तानचा पर्यटक फुटलेल्या बाटलीवर पाय पडल्याने गंभीर जखमी झाला.
९ फेब्रुवारी (पाटणे) : बेल्जियमच्या पर्यटकाला चालताना काच लागून पायाला मोठी दुखापत झाली.
१६ मार्च (कळंगुट) : हुबळी येथील एका १० वर्षांच्या चिमुरड्याला खेळताना काच टोचल्याने मोठी जखम झाली.
११ एप्रिल (कोलवा) : गुजरातच्या ४० वर्षीय पर्यटकाच्या पायाच्या बोटाला फुटलेल्या बाटलीमुळे गंभीर दुखापत झाली.