साकोर्डा जंगलात आढळला मृत पट्टेरी वाघ

नैसर्गिक मृत्यू झाल्याचा वन अधिकाऱ्यांचा अंदाज

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd May, 11:34 pm
साकोर्डा जंगलात आढळला मृत पट्टेरी वाघ

फोंडा : देऊळमळ- साकोर्डा येथील जंगलात शनिवारी दुपारी एक मृत पट्टेरी वाघ आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत वाघाच्या सापडलेल्या सापळ्यावरून अंदाजे १० ते १२ दिवसांपूर्वी त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वन खात्याचे अधिकारी व्यक्त करीत आहे.

राज्यात २००९ पासून एकूण ६ मृत वाघ सापडल्याने वाघाचे अस्तित्व असल्याचा दावा निसर्गप्रेमी राजेंद्र केरकर यांनी केला आहे. शनिवारी निसर्गप्रेमी राजेंद्र केरकर यांना जंगलात मृत वाघ असल्याची माहिती मिळाली. राजेंद्र केरकर यांनी त्वरित वन खात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन परिसरात पाचारण केले. उपवनपाल जिस वर्की व अन्य वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी परिसरात जाऊन पंचनामा केला. रस्त्यापासून अंदाजे २०० मीटर अंतरावरील जंगलात पट्टेरी वाघाच्या कातडीचे दोन भाग आढळून आले. उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्या त्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा संशय वन खात्याचे अधिकारी व्यक्त करीत आहेत.

निसर्गप्रेमी राजेंद्र केरकर म्हणाले, गोव्यातील जंगलात पट्टेरी वाघ आहेत. २०२० साली झालेल्या जनगणनेत गोव्यात ५ पट्टेरी वाघ अस्तित्वात असल्याचे स्पष्ट झाले होते. २००९ साली १, २०१९ साली ४ आणि यावर्षी एका पट्टेरी वाघाचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात वाघाच्या मृत्यूची तिसरी घटना घडली असून जंगलातील जनावरांचे संवर्धन होत नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. मोठ्या प्रमाणात जनावरांची शिकार करण्यात येत असून वनखात्याकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. साकोर्डा भागात मोठ्या प्रमाणात जनावरांची शिकार करण्यात येत आहे. सरकारने जनावरांचे संवर्धन करण्यासाठी योग्य पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले.

जंगलात आढळून आलेल्या पट्टेरी वाघाचा मृत्यू १०-१२ दिवसांपूर्वी झाल्याचा संशय आहे. उत्तरीय तपासणीनंतरच वाघाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. परंतु वय झाल्यामुळे वाघाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे उपवनपाल जिस वर्की यांनी सांगितले. 

साकोर्डा भागात जनावरांची शिकार

साकोर्डा भागात गेल्या काही वर्षांपासून रानडुक्कर व अन्य जनावरांची शिकार करण्यासाठी रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने बाहेर गावातील लोक शिकरीसाठी येत आहेत. परंतु, वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नसल्यामुळे स्थानिक लोक संताप व्यक्त करीत आहेत. तसेच वन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या कित्येक वर्षे होत नसल्याने सुद्धा स्थानिक लोक नाराजी व्यक्त करीत आहेत. 

हेही वाचा