पूरनियंत्रणासाठी सर्व यंत्रणा सतर्क ठेवा : मुख्यमंत्री

मानसूनपूर्व कामे सुरू : जलस्रोत खात्यातर्फे कुडणे येथे कामाचा प्रारंभ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd May, 11:42 pm
पूरनियंत्रणासाठी सर्व यंत्रणा सतर्क ठेवा : मुख्यमंत्री

कुडणे येथे नाल्यातील गाळ उपसण्याच्या कामाचा शुभारंभ करताना सरपंच दामोदर पेटकर. सोबत राजन फाळकर, विनोद भंडारी व इतर.

डिचोली : राज्यात पावसाळ्यात संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वीच सर्व संबंधित विभागांनी सतर्क राहून आवश्यक उपाययोजना पूर्ण कराव्यात, तसेच नदी-नाल्यांमधील गाळ उपसण्याची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्या आहेत. यासाठी उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेऊन सर्व विभागांना आवश्यक निर्देश देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर डिचोली तालुक्यात जलस्रोत खात्यातर्फे नदी-नाल्यांमधील गाळ उपसण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. कुडणे येथे या कामाचा शुभारंभ सरपंच दामोदर पेटकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी जलस्रोत खात्याचे अधिकारी विनोद भंडारी, पंचायत सदस्य राजन फाळकर, विवेक परब, दीपिका नाईक, सुभाष मळीक, दशरथ नाईक, तानाजी राव देसाई तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
डिचोली तालुक्यात दरवर्षी मुसळधार पावसामुळे काही भागांत पूरस्थिती निर्माण होत असल्याने पूरप्रवण क्षेत्रांतील नदी-नाल्यांमधील गाळ उपसण्याची कामे हाती घेण्यात येतात. यंदाही मये, डिचोली आणि साखळी या तीनही मतदारसंघांतील विविध नदी व नाल्यांमध्ये गाळ उपसण्याची कामे करण्यात येणार असल्याची माहिती जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
नगराध्यक्षा सिद्धी प्रभू आणि उपनगराध्यक्ष दयानंद बोर्येकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, साखळी नगरपालिकेने सर्व प्रभागांतील गटारे साफ करणे आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी नगरपालिका व पंचायत क्षेत्रातील कामांचा आढावा घेतला असून, शहरात गटार साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी कुडणे, पिळगाव आणि अन्य भागांतील पूरप्रवण क्षेत्रांत तातडीने कामे पूर्ण करण्यासाठी जलसंपदा खात्याशी समन्वय साधला आहे.
आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश
मुख्यमंत्र्यांनी केवळ मान्सूनपूर्व कामांवरच भर दिला नाही, तर आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नियंत्रण कक्ष सुसज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आवश्यक साहित्य, वाहने आणि मनुष्यबळ २४ तास उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना दिल्या आहेत. जेणेकरून कोणत्याही संकटाच्या वेळी नागरिकांना त्वरित मदत मिळेल, असे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा