हिंदू देवतांची विटंबना करणाऱ्यांविरोधात हिंदू संघटनांचे पोलीस मुख्यालयासमोर आंदोलन

तीन दिवसांत गुन्हा नोंद करण्याची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd May, 11:35 pm
हिंदू देवतांची विटंबना करणाऱ्यांविरोधात हिंदू संघटनांचे पोलीस मुख्यालयासमोर आंदोलन

पणजी : समाज माध्यमांवर हिंदू देवतांची, धर्माची बदनामी करणाऱ्यांविरोधात शनिवारी विविध हिंदू संघटना आक्रमक झाल्या. संघटनांनी येथील पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढून अशा बदनामी करणाऱ्या पोस्ट टाकलेल्या व्यक्तींसह वॉरेन आलेमाव, गिरीश चोडणकर आणि गोविंद शिरोडकर यांना अटक करण्याची मागणी केली. तसेच या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली. याबाबत संघटनांनी पोलीस उपअधीक्षक सुदेश नाईक यांना निवेदन दिले.

आंदोलकांनी रात्री उशिरापर्यंत मुख्यालयासमोर आंदोलन केले. तीन दिवसात एफआयआर दाखल न झाल्यास मुख्यालयासमोर मोठ्या संख्येने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. तत्पूर्वी संघटनांनी आझाद मैदानावर ‘हिंदू आक्रोश सभे’चे आयोजन केले होते. यावेळी गोविंद चोडणकर यांनी समाज माध्यमांवरून हिंदू देव देवतांविरोधात पोस्ट टाकून त्यांची विटंबना करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. याबाबत पोलिसांनी तिघांविरोधात लुकआउट नोटीस जारी केली असली तरी ही कारवाई पुरेशी नाही. विटंबना करणाऱ्यांना त्वरित अटक झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. या सभेमध्ये सत्यविजय नाईक, शैलेंद्र वेलिंगकर, नितीन फळदेसाई, सिद्धार्थ मांद्रेकर, विनायक च्यारी व अन्य उपस्थित होते.

चोडणकर म्हणाले की, गोव्यात ६६ टक्के हिंदू असले तरी त्यांच्यावर वेळोवेळी अन्याय केला जात आहे. गोव्याची निर्मिती करणाऱ्या भगवान परशुराम यांसह अन्य देवी देवतांची समाजमाध्यमांवर बदनामी केली जात आहे. याबाबत आम्ही राज्यभरातील विविध पोलीस स्थानकांत तक्रारी दिल्या आहेत. यामुळे प्रशासनावर थोडासा दबाव आल्याने आता अशा पोस्ट लिहिणाऱ्यांविरोधात लुकआउट नोटीस काढली आहे. हे लोक सापडत नसतील, ते देशाबाहेर असतील तर त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
इतिहास बदलण्याचे प्रयत्न खपवून घेणार नाही
सभेला संबोधित करताना शैलेंद्र वेलिंगकर म्हणाले की, मागील ८ ते १० वर्षांपासून जाणीवपूर्वक समाज माध्यमांचा वापर करून हिंदू धर्माची बदनामी करण्याचे कारस्थान सुरू आहे. हिंदू धर्म हा सह-अस्तित्व मानणारा असला, तरी आमच्या देवतांची विटंबना सहन केली जाणार नाही. गोव्यातील धार्मिक छळाचा इतिहास बदलण्याचे किंवा लपवण्याचे प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा