आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या गौतम खट्टरला जामीन, बांगलादेशी टोळीतील दरोडेखोरांना अटक

पणजी : वास्को येथील सार्वजनिक कार्यक्रमात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या गौतम खट्टर याला वास्को प्रथमवर्ग न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. दोनापावला आणि म्हापसा येथे सशस्त्र दरोडे टाकून लाखोंचा ऐवज लुटणाऱ्या बांगलादेशी टोळीतील पाच संशयितांना अटक केली आहे. याशिवाय अपघाती मृत्यू, चोरीच्या घटना घडल्या आहेत. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.
रविवार
हरमलात २० लाखांच्या अहेराची बॅग लंपास
हरमल येथील एका विवाह सोहळ्यात अहेराची बॅग अज्ञात चोराने लंपास केली. फोटो सेशनवेळी बॅग बाजूला ठेवल्यानंतर चोराने डाव साधला. या बॅगेत ८ तोळ्यांचा सुवर्णहार, अंगठी, मोबाईल, अहेराची पाकिटे मिळून अंदाजे २० लाख रुपयांचा ऐवज होता. ही बॅग नवऱ्याकडच्या बाजूची होती.
बागा-कळंगुट येथे दुचाकींच्या धडकेत दोघा युवकांचा मृत्यू
बागा-कळंगुट येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात मूळ गुजरात मधील अनिल उग्रेजिया (२७, रा. कांदोळी) व अरुण गोडीचा (२६, रा. गिरी) या दोघा युवकांचा मृत्यू झाला. ठाणे मुंबईतील शशांक जाधव (३६) व श्रीजी नायर (३३) हे जखमी झाले असून अपघातास कारणीभूत दुचाकीचालक शशांक यांच्याविरुद्ध कळंगुट पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

गौतम खट्टरची सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी
वास्को येथील सार्वजनिक कार्यक्रमात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून धार्मिक तेढ निर्माण करणारा संशयित गौतम खट्टर याला गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने अटक करून गोव्यात आणले. यानंतर गौतमला वास्को येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले असता न्या. पूजा देसाई यांनी सहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.
सोमवार
माधव खट्टरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
वास्को येथील सार्वजनिक कार्यक्रमात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल संशयित गौतम खट्टर याने आक्षेपार्ह वक्तव्य करून धार्मिक तेढ निर्माण केला होता. या प्रकरणी गौतम खट्टरचा भाऊ माधव खट्टर याला वास्को प्रथमवर्ग न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
कारची दोन दुचाकींना धडक, दोघे जखमी, चालकावर गुन्हा
मडगावातील एमसीसीच्या मैदानानजीक कार चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवून दोन दुचाकींना धडक दिली. यात दोघा दुचाकीस्वारांना दुखापत झाली. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी कार चालक डेनी मोथीदास (रा. मुरगाव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
साल्वादोर द मुंद वनसंहार प्रकरणी गुन्हा दाखल
साल्वादोर द मुंद येथील डोंगराळ भागातील हिरवे कवच नष्ट तसेच निसर्गाचा संहार करण्याच्या प्रकाराविरुद्ध ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींनी ‘आमचे जंगल, आमचे भविष्य’ या झेंड्याखाली निदर्शने केली होती. याची दखल घेत वन खात्याने संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा बडगा उगारत गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवार
चिंबल परिसरातील ६० ते ७० बोअरवेल सील करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
चिंबल परिसरात अनधिकृतपणे खोदण्यात आलेले ६० ते ७० बेकायदेशीर बोअरवेल सील करण्याचे निर्देश गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने जलस्रोत खात्याला दिले आहेत. जुने गोवा पोलिसांना कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची खात्री करावी, तसेच पंचायतीला कारवाईला साहाय्य करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.
माधव खट्टरला जामीन
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषण गौतम खट्टरनेच लिहिले आहे, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे, असे निरीक्षण नोंदवून या प्रकरणातील संशयित माधव खट्टर याला १० हजार रुपये व इतर अटींवर न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.

जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार रोहन हरमलकरचा जामीन अर्ज फेटाळला
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणी केलेल्या अटकेनंतर रोहन हरमलकरने दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. जमीन हडप केल्याच्या प्रकरणातील गंभीर तथ्ये आणि ईडीने सादर केलेले पुरावे लक्षात घेता हरमलकरला तूर्तास कोठडीतच रहावे लागणार आहे.
बुधवार
कपिलेश्वर देवस्थानाच्या तळीत आढळला युवतीचा मृतदेह
रात्री उशिरा घरी आल्यामुळे वडील रागावल्याने कायद्याचा अभ्यास करणाऱ्या एका २१ वर्षीय युवतीने टोकाचा निर्णय घेतला. सकाळी मुलगी घरात न दिसल्याने तिचा शोध घेतला असता, कपिलेश्वरी येथील देव कपिलेश्वर देवस्थानच्या तळीत तिचा मृतदेह आढळून आला. फोंडा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला.
कांदोळीत आयपीएल सट्टेबाजीचा पर्दाफाश, ४ जणांना अटक
कांदोळी येथे चालणाऱ्या आयपीएल क्रिकेट सट्टेबाजीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी गुजरातमधील चार संशयितांना अटक करून ८ मोबाईलसह ५ लाखांचे जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले.
अमेरिकनांना लुबाडणाऱ्या दोन बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश
दोनापावला आणि सांतिनेज येथून अमेरिकन नागरिकांना कर्ज व इतर सुविधा देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोन बनावट कॉल सेंटरचा गुन्हा शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी गुन्हा शाखेने दोनापावला आणि सांतिनेझ या दोन ठिकाणी छापा टाकून सतरा जणांना अटक केली. त्यांच्याकडून ९४.७० लाख किमतीचे १५ लॅपटाॅप, २४ मोबाईल, ४ चारचाकी व इतर साहित्य जप्त केले.
गुरुवार

सशस्त्र दरोडे टाकणाऱ्या बांगलादेशी टोळीला ११ दिवसांची कोठडी
दोनापावला आणि म्हापसा येथे सशस्त्र दरोडे टाकून लाखोंचा ऐवज लुटणाऱ्या बांगलादेशी टोळीतील पाच संशयितांना गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने दिल्लीतून गोव्यात आणून अटक केली आहे. या संशयितांना पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, त्यांना ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
हॉकीचा सराव करताना डोक्यावर बॉल लागल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू
मोंतेगिरी (बार्देश) येथील सेंट अॅन्थनी हायस्कूलच्या क्रीडा मैदानावर हॉकीचा सराव सुरू असताना डोक्यावर बॉल लागल्याने १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. रुईशा सुधीर खर्सेल (१४, रा. अग्निवाडा, गिरी) असे या नववीत शिकणाऱ्या मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
बस कंडक्टरला १० वर्षांचा कारावास
मुरगाव तालुक्यातील एका १७ वर्षीय मुलीवर बसमध्ये लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मेरशी येथील पॉक्सो न्यायालयाने २२ वर्षीय बस कंडक्टरला १० वर्षांचा सश्रम कारावास आणि ४५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्याचा निकाल न्या. पूजा कवळेकर यांनी दिला.
सुकूर येथे स्वयंअपघातात युवक ठार
खर्रे सुकूर येथे मोटारसायकलची झाडाला धडक बसल्याने झालेल्या स्वयंअपघातात जॉन पॉल फर्नांडिस (३४, गावरावाडो, कळंगुट) या दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला. अपघात बुधवारी पहाटे ५.३० च्या सुमारास खर्रे सुकूर येथील वालांकिनी चॅपेलजवळ घडला होता. तर सायंकाळी उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू झाला.
केरये-खांडेपार येथे कार उलटल्याने ४ जण जखमी
केरये-खांडेपार येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावर उलटली. अपघातात कारमधील ४ जण जखमी झाले. जखमींना त्वरित १०८ रुग्णवाहिकेतून उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.
शुक्रवार

पीडब्ल्यूडी कामगार पुरवठा सोसायटीच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन
पीडब्ल्यूडी कामगार पुरवठा सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल, असा इशारा अॅड. अजय प्रभुगावकर यांनी दिला.
डॉ. मीनाक्षी हल्ला प्रकरणी पंच सदस्याला कारावास
प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ तथा अभिनेत्री डॉ. मीनाक्षी मार्टिन्स यांच्यावरील हल्ला आणि विनयभंग प्रकरणी म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने साल्वादोर दी मुंदचे पंच सदस्य विजय दळवी याच्या शिक्षेत वाढ करून एक वर्षाचा कारावासाची शिक्षा दिली. तसेच मार्टिन्स यांना १ लाख रुपये भरपाई देण्यास सांगितले. तर आरोपी श्वेता कांदोळकर यांना सहा महिन्याचा कारावास आणि ७५ हजार रुपये भरपाई देण्यास सांगितले. तर श्रीकांत आर्लेकर याची निर्दोष सुटका केली.
वाळपई पोलीस ठाण्यासमोर आंदोलन
प्रेमसंबंधाच्या वादातून तरुणीच्या कुटुंबीयांकडून व दुसऱ्या प्रियकराकडून मारहाण झाल्यानंतर तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या मोईनवरच पोलिसांनी कारवाई करून मारहाण केली. या मानसिक धक्क्यातून मोईनने घरी गळफास घेऊन जीवन संपवले, असा दावा मोईनच्या कुटुंबियांनी केला. या घटनेनंतर नागरिकांनी वाळपई पोलीस ठाण्यासमोर आंदोलन छेडत संबंधित पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या निलंबनाची मागणी केली.
शनिवार
पीएसआय प्रथमेश गावस यांची बदली
वाळपई पोलीस ठाण्यात मोहिन शेख याला मारहाण केल्याचा आरोप असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रथमेश गावस यांची राखीव लाईनमध्ये बदली करण्यात आली.
गौतम खट्टरला सशर्त जामीन
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात वास्को प्रथमवर्ग न्यायालयाने गौतम खट्टरला सशर्त जामीन मंजूर केला.
धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तिघांविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी
म्हापसा, डिचोली आणि फोंडा पोलिसांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह व अवमानकारक टिप्पणी करून धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून तिघांविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली आहे.
लक्षवेधी
इयत्ता दहावीच्या परीक्षेत मुलांपेक्षा मुलींची कामगिरी चांगली झाली आहे. मुलींचा निकाल ९६.५१ टक्के, तर मुलांचा निकाल ९४.३७ टक्के लागला. परीक्षेला बसलेल्या २०,६१८ विद्यार्थ्यांपैकी १९,४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे सरासरी निकाल ९४.५१ टक्के लागला.
जुने गोवा येथे असलेल्या ऐतिहासिक खांबाविषयी नव्याने चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांनी तो खांब ‘नवो खांब’ असल्याचा दावा केला आहे. हातकतरो खांबाविषयी पुरावे नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. इतिहासतज्ज्ञ प्रजल साखरदांडे यांनी या खांबावर फक्त गुन्हेगारांचे हात कापले जात होते, असे म्हटले आहे, तर हिंदुत्ववादी संघटनांनी जुने गोवे येथे उत्खनन करून सत्य शोधण्याची मागणी केली आहे.
मडगाव शहरातील पदपथांवरील अतिक्रमणे हटवण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी मधू नार्वेकर यांना न्यायालयीन अवमान नोटीस बजावली आहे.
कोलवा येथे एका १८ वर्षीय युवकावर ४ ते ५ जणांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली. क्लॅविन फर्नांडिस असे या पीडिताचे नाव असून संशयितांनी क्लॅविनसह त्याच्या आईलाही शिवीगाळ करत तिच्यावर हल्ला केला. याशिवाय दुचाकीचेही नुकसान केले.