कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल

नवी दिल्ली: सततच्या कौटुंबिक वादाला कंटाळून एका न्यायाधीशाने आत्महत्या केल्याची घटना दिल्लीच्या ग्रीन पार्क एरियामधून समोर आली आहे. अमन कुमार शर्मा असे या मृत न्यायाधीशाचे नाव असून, ते ईशान्य दिल्लीतील कडकडडूमा न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे (DLSA) सचिव म्हणून कार्यरत होते. या घटनेमुळे न्यायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमन शर्मा यांचा मृतदेह त्यांच्या घरातील बाथरुममध्ये आढळून आला. ही घटना शनिवारी रात्री उशिरा उघडकीस आली. शर्मा यांच्या मेहुण्याने पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बाथरुमचा दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढले आणि रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार, शर्मा यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणाला आता कौटुंबिक वादाचे वळण लागले आहे. शर्मा यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. मृत न्यायाधीशांची पत्नी देखील एक न्यायिक अधिकारी आहे. आत्महत्येच्या काही तास आधी अमन यांनी आपल्या वडिलांना फोन केला होता. मी खूप त्रासात आहे, माझे जगणे कठीण झाले आहे, असे सांगत ते फोनवर रडले होते. वडिलांनी दिलेल्या जबानीनुसार, घरात पत्नीचे वर्चस्व होते आणि त्यांना मानसिक त्रास दिला जात होता. वडिलांनी दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांशी संपर्क साधून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आले नाही.
घटनेच्या दिवशी घरात पती-पत्नीमध्ये मोठ्या प्रमाणावर वादावादी झाल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. पत्नी मोठ्या आवाजात ओरडत होती आणि अमन रडत होते, असा दावा वडिलांनी केला आहे. त्यानंतर काही वेळातच अमन बेपत्ता झाले आणि त्यांचा फोन बाथरुममध्ये वाजत असल्याचे निदर्शनास आले. खिडकीची काच फोडून आत प्रवेश केला असता, त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.
अमन कुमार शर्मा यांनी २०१८ मध्ये सिम्बायोसिस लॉ स्कूल, पुणे येथून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले होते. २०२१ मध्ये ते दिल्ली न्यायिक सेवेत रुजू झाले होते. त्यांच्या निधनामुळे कडकडडूमा बार असोसिएशनने दुःख व्यक्त केले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, यामागे नेमके कोणते कारण आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिकारी नातेवाईक आणि निकटवर्तीयांची चौकशी करत आहेत.