
भोपाळ : मध्यप्रदेशातील विदिशा-रायसेन जिल्ह्यातील घटना. आपल्या डोळ्यादेखत आईची हत्या होताना पाहिल्यानंतर, जन्मदात्या बापानेच एका दोन वर्षांच्या चिमुरड्याला घनदाट जंगलात सोडून दिले. हिंस्त्र श्वापदे आणि कडाक्याची थंडी असतानाही हा चिमुरडा अनवाणी पायांनी २० तास जंगलात भटकत राहिला आणि अखेर सुखरूप बचावला.
ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. विदिशा जिल्ह्यातील एका २५ वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीची दगडाने ठेचून हत्या केली. यावेळी त्यांचा दोन वर्षांचा मुलगा तिथेच उपस्थित होता. हत्येनंतर या व्यक्तीने मुलाला दुचाकीवर बसवून रायसेन जिल्ह्यातील बेगमगंज परिसरातील घनदाट जंगलात नेले. एका ओढ्याजवळ मुलाला सोडून तो दुचाकीसह तिथून पसार झाला. हे जंगल वाघ, बिबट्या आणि इतर हिंस्त्र प्राण्यांसाठी ओळखले जाते, जिथे मोठी माणसांनाही जाण्यास घाबरतात.
पत्नीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी संशयित म्हणून पतीला अटक केली. मात्र, त्याने सुरुवातीला मुलाबद्दल काहीही सांगितले नाही. नातेवाईकांकडे चौकशी केल्यानंतर मुलगा बेपत्ता असल्याचे समोर आले. रात्र झालेली असतानाही पोलिसांनी तातडीने सर्च ऑपरेशन सुरू केले. टॉर्चच्या साहाय्याने रात्रभर शेतशिवारे, डोंगरदऱ्या आणि ओढे पालथे घातले गेले.
रविवारी सकाळी ८:३० च्या सुमारास पोलिसांना एका झुडपामागून रडण्याचा क्षीण आवाज ऐकू आला. पोलिसांनी धाव घेतली असता, हा चिमुरडा अनवाणी पायांनी चालताना दिसला. २० तास काहीही न खाल्ल्यामुळे तो प्रचंड थकलेला आणि निर्जलीकरण झालेला होता. पोलिसांनी त्याला पाहताच पाणी आणि बिस्किटे दिली, जी त्याने भुकेल्यापोटी हातातून ओढून घेतली.
बेगमगंजच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली गुप्ता यांनी सांगितले की, एवढ्या लहान मुलाने रात्रभर हिंस्त्र प्राण्यांच्या जंगलात तग धरणे ही कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे. हा चिमुरडा त्याच्या आईच्या हत्येचा एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती आता स्थिर आहे.