केरळमध्ये 'पिनराई पर्वा'चा अंत; काँग्रेसप्रणीत यूडीएफचा दणदणीत विजय

भाजपच्या पारड्यात २ जागा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
just now
केरळमध्ये 'पिनराई पर्वा'चा अंत; काँग्रेसप्रणीत यूडीएफचा दणदणीत विजय

तिरुअनंतपुरम : केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीचे (एलडीएफ) सलग दोन टर्मचे शासन संपवून मतदारांनी काँग्रेसप्रणीत संयुक्त लोकशाही आघाडीला (यूडीएफ) स्पष्ट बहुमत दिले आहे. सोमवारी, ४ मे रोजी जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी केरळच्या राजकीय पटलावर मोठी उलथापालथ घडवून आणली. या निकालांमुळे १९७७-७९ नंतर प्रथमच भारतातील एकाही राज्यात डाव्या पक्षांची सत्ता राहिलेली नाही. 

१४० जागांच्या विधानसभा निवडणुकीत यूडीएफने १०० हून अधिक जागांवर आघाडी घेत आपला विजय निश्चित केला. २०२१ च्या निवडणुकीत केवळ ४१ जागा जिंकणाऱ्या यूडीएफने यंदा आपली कामगिरी लक्षणीयरीत्या सुधारली आहे. काँग्रेसच्या अनेक उमेदवारांनी एलडीएफच्या दिग्गज मंत्र्यांना धूळ चारली. केरळमध्ये दर पाच वर्षांनी सत्तांतर करण्याची जुनी परंपरा आहे, मात्र २०२१ मध्ये डाव्यांनी ती परंपरा मोडीत काढली होती. यंदा मात्र मतदारांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या बाजूने कौल दिला.

या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे केरळमध्ये भाजप केलेला शिरकाव. राज्याच्या इतिहासात प्रथमच भाजपला दोन जागांवर विजय मिळाला आहे. कोल्लम जिल्ह्यातील चाथमनंगलम मतदारसंघातून बी. बी. गोपाकुमार तर तिरुवनंतपुरमच्या नेमम मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी विजय मिळवला. २०२१ मध्ये एकही जागा न जिंकू शकलेल्या भाजपसाठी हा निकाल दिलासादायक आहे. 

एकूणच, पिनराई विजयन यांच्या ऐतिहासिक दोन कार्यकाळांनंतर केरळने बदलाचा स्वीकार केला आहे. प्रस्थापित सत्तेविरुद्ध असलेल्या नाराजीचा फायदा यूडीएफला मिळाला असून, आता राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डाव्या पक्षांसाठी हा पराभव म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील त्यांच्या अस्तित्वासाठी एक मोठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

हेही वाचा