सनातन धर्माचा आदर करतो; वॉरेन आलेमाव यांची पोलिसांच्या चौकशीत सहकार्याची ग्वाही

गौतम खट्टराला गोव्यात प्रवेशबंदी करण्याची मागणी केल्याचा आलेमाव यांनी केला पुनरुच्चार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
1 hours ago
सनातन धर्माचा आदर करतो; वॉरेन आलेमाव यांची पोलिसांच्या चौकशीत सहकार्याची ग्वाही

पणजी : सनातन धर्माबद्दल माझ्या मनात नितांत आदर असून, माझे अनेक मित्र हिंदू आहेत. गोव्यात हिंदू, ख्रिश्चन अशा सर्व धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात, त्यामुळे आपण कधीही सनातन धर्माच्या विरोधात बोललो नाही. माझ्या वक्तव्याचा आणि व्हिडिओचा विपर्यास करण्यात आला, असा खुलासा वॉरेन आलेमाव यांनी केला आहे. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओ प्रकरणी पणजी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर, आलेमाव यांनी सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांसमोर हजेरी लावून चौकशीत पूर्ण सहकार्य केले.

पणजी पोलिसांसमोर चौकशी पूर्ण झाल्यानंतर आलेमाव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की आपण एक कायदा पाळणारे आणि गोव्याचे हित जपणारे नागरिक आहोत. त्यामुळे पोलीस जेव्हा-जेव्हा आपल्याला चौकशीसाठी बोलावतील, तेव्हा-तेव्हा आपण उपस्थित राहून तपासात संपूर्ण सहकार्य करू. आपण फक्त गौतम खट्टराला गोव्यात येण्यापासून बंदी घालावी, एवढेच विधान केले होते. मात्र, त्या विधानाचा चुकीचा अर्थ लावून वाद निर्माण केला गेला.

यावेळी आलेमाव यांनी गोव्यातील धार्मिक सलोख्याचा उल्लेख करत राज्यात सर्व धर्मांमध्ये एकोपा असल्याचे सांगितले. तसेच, ज्या संघटनेने वास्को येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात गौतम खट्टराला निमंत्रण दिले होते, त्या संघटनेचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.


हेही वाचा