किमान माध्यमिक शिक्षणात गोवा देशात तृतीय स्थानी

केंद्रीय सांख्यिकी अहवालातून माहिती उघड : पुरुषांसह महिलांच्या शैक्षणिक स्तरातही लक्षणीय सुधारणा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd May, 11:50 pm
किमान माध्यमिक शिक्षणात गोवा देशात तृतीय स्थानी

पणजी : आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये गोव्यातील २५ वर्षांवरील ७८.८ टक्के लोकांचे किमान शिक्षण माध्यमिक स्तरापर्यंत पूर्ण झाले होते. किमान माध्यमिक शिक्षण अर्हता असणाऱ्यांच्या क्रमवारीत गोवा देशात तिसऱ्या स्थानी आहे. याची राष्ट्रीय सरासरी ६१ टक्के इतकी आहे. या क्रमवारीत ९२.६ टक्क्यांसह मिझोरम पहिल्या तर ८०.८ टक्क्यांसह मणिपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. केंद्र शासित प्रदेशात दिल्लीमध्ये ही टक्केवारी ७९.९ आहे. केंद्रीय सांख्यिकी खात्याच्या भारतातील महिला आणि पुरुष २०२५ या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
अहवालानुसार, २०२०-२१ मध्ये गोव्यातील २५ वर्षांवरील ६९ टक्के लोक किमान माध्यमिक शैक्षणिक स्तरापर्यंत उत्तीर्ण होते. यानंतर दरवर्षी ही टक्केवारी वाढत गेली आहे. २०२१-२२ मध्ये ७१.९ टक्के, २०२२-२३ मध्ये ७३.८ टक्के, २०२३-२४ मध्ये ७८.९ टक्के तर २०२४-२५ मध्ये ७८.८ टक्के लोकांचे किमान शिक्षण माध्यमिक पूर्ण होते. लिंगनिहाय पाहता २०२०-२१ मध्ये ७८.६ टक्के पुरुष, तर ५९.८ टक्के महिलांनी वरील निकष पूर्ण केला होता. २०२१-२२ मध्ये ७६.४ टक्के पुरुष, तर ६७.७ टक्के महिलांनी हा निकष पूर्ण केला होता.
यानंतरच्या आर्थिक वर्षात २५ वर्षांवरील किमान माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेल्या महिलांची टक्केवारी वाढत आहे. २०२२-२३ मध्ये गोव्यातील ८०.१ टक्के पुरुष व ६८.७ टक्के महिला किमान माध्यमिक शिक्षण पूर्ण झालेल्या होत्या. २०२३-२४ मध्ये गोव्यातील ८६.८ टक्के पुरुष व ७१.२ टक्के महिला किमान माध्यमिक शिक्षण पूर्ण झालेल्या होत्या. तर २०२४-२५ मध्ये गोव्यातील ८३.९ टक्के पुरुष व ७३ टक्के महिला किमान माध्यमिक शिक्षण पूर्ण झालेल्या असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
बिहारमधील टक्केवारी सर्वात कमी
अहवालानुसार, २०२४-२५ मध्ये बिहारमध्ये सर्वात कमी ४६.२ टक्के लोकांचे किमान माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले होते. आंध्र प्रदेश (४९.१ टक्के), राजस्थान (५०.३ टक्के), तेलंगणा (५३.७ टक्के), झारखंड (५५.५ टक्के) या राज्यात देखील हे प्रमाण कमी होते.

हेही वाचा