दोन्ही आरोपींना सशर्त जामिनावर मुक्त करण्याचे आदेश

पणजी : बँक कर्ज फसवणूक प्रकरणी कॅनरा बँकेचे माजी अधिकारी वलिवेटी वेंकट नरसिम्हा शास्त्री आणि यासीन एम. शेख या दोघांना मेरशी येथील विशेष न्यायालयाने दिलेली कारावासाची शिक्षा गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने स्थगित ठेवली आहे. तसेच न्यायालयाने दोन्ही आरोपींना सशर्त जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
कॅनरा बँकेच्या फोंडा शाखेने २०११ मध्ये केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, तत्कालीन निरीक्षक नीलेश शिरोडकर यांनी तक्रारीची दखल घेऊन गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. त्यानुसार, फोंडा शाखेतील कॅनरा बँकेचे तत्कालीन अधिकारी वलिवेटी वेंकट नरसिम्हा शास्त्री यांनी बँकेचे ग्राहक यासीन शेख यांना आधीच त्यांच्या मालकीची असलेल्या हुंडाई कारसाठी ५ लाख रुपयांचे कार मोबाईल कर्ज मंजूर केले होते. त्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करून वाहनाची पूर्वमालकी लपविण्यात आली होती.
याच दरम्यान यासीन शेख याने कोल्हापूर शाखेकडूनही त्याच वाहनासाठी दुसरे ५ लाखांचे कर्ज मंजूर करून घेतले होते. त्यामुळे शास्त्री यांनी बँक नियमांचे उल्लंघन, अधिकाराचा गैरवापर करून खासगी व्यक्तीला मदत केली. तसेच बँकेचे नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले होते.
या प्रकरणी तपास पूर्ण करून निरीक्षक शिरोडकर यांनी वरील दोन्ही आरोपींविरोधात उत्तर गोवा विशेष न्यायालयात षड्यंत्र रचणे, फसवणूक आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली आरोपपत्र दाखल केले होते. तसेच अशाच पद्धतीचे आरोपपत्र कोल्हापूर न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू आहेत. तर, गोव्याच्या न्यायालयात सीबीआयतर्फे विशेष अभियोक्ता मंजित सिंग यांनी बाजू मांडून आरोपी विरोधात पुरावे सादर केले.
विशेष न्यायालयाचे तत्कालीन न्या. ईर्शाद आगा यांनी पुराव्याची दखल घेऊन दोन्ही आरोपींना दोषी ठरवून एका वर्षाची साधी कैद आणि दंड ठोठावला. त्यानंतर दोन्ही आरोपींना कोलवाळ तुरुंगात पाठविण्यात आले. या शिक्षेला दोन्ही आरोपींनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
नरसिम्हातर्फे अॅड. दिनेश नाईक तर शेख याच्यातर्फे अॅड. शशांत नाईक यांनी बाजू मांडली.
शास्त्री याला ५० हजार रुपये दंड
न्यायालयाने प्राथमिक सुनावणी घेऊन दोघांची शिक्षा स्थगित ठेवली. तसेच वलिवेटी वेंकट नरसिम्हा शास्त्री याला ५० हजार रुपये दंड ठोठावला. तर १० हजार रुपये व इतर अटींवर जामीन मंजूर केला. तसेच यासीन एम. शेख याला २० हजार रुपये दंड ठोठावला.