१६ प्रवासी जखमी : दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

डिचोली : तालुक्यातील नानोडा येथे रविवारी खासगी मिनी बस आणि थार वाहनामध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला. अस्नोडा येथून इब्रामपूरकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या मिनी बसला समोरून येणाऱ्या थारने जोरदार धडक दिली. धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून अपघाताची तीव्रता भीषण होती.

मिनी बसमध्ये सुमारे २५ ते ३० प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी १६ प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने डिचोली येथील सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. उपचारानंतर काही जखमींना घरी सोडण्यात आले, तर एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला बांबोळी येथील गोमेको येथे हलवण्यात आले. तसेच तीन जखमी प्रवासी अद्याप डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत.
दरम्यान, डिचोली पोलीस अपघात नेमका कसा घडला याचा तपास करीत आहेत
आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी भेट देत जखमींची विचारपूस केली. दरम्यान, स्थानिकांनी सदर अपघात घडल्यानंतर घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
पोलिसांनी गस्त वाढवावी!
लाटंबार्से पंचायत क्षेत्रात लहान मोठी फार्महाऊस असल्याने विकेंडच्या काळात बाहेरगावाहून मोठ्या प्रमाणावर पर्यटक या भागात येतात. पार्टी करून परतताना काहीजण मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याने अपघातांची संख्या वाढत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. डिचोली पोलिसांनी विशेषतः शनिवारी व रविवारी गस्त वाढवून अशा प्रकारांना आळा घालावा, तसेच नशेत वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.