बहिणीवरही हल्ला : एका संशयिताला अटक तर दुसरा फरार

फोंडा : खाजोर्डा-बोरी येथे रविवारी संध्याकाळी जमिनीच्या वादातून दीपक राया नाईक (५८) यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली. या खून प्रकरणात त्यांच्या चुलत भावाच्या एका मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दुसरा संशयित अद्याप फरार आहे. दीपक नाईक आणि संशयित आरोपी यांच्यात जमिनीचा वाद सुरू होता. रविवारी संध्याकाळी दीपक हे आपल्या घरासमोरील झोपडीत ठेवलेली कौले घेऊन जात होते. यावेळी त्यांच्या चुलत भावाच्या दोन्ही मुलांनी त्यांच्याशी शाब्दिक वाद घालण्यास सुरुवात केली. या वादातून एका संशयिताने मागून धावत येऊन दीपक यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने पहिला वार केला. ते जमिनीवर कोसळल्यानंतर त्यांच्या गळ्यावर वार करून त्यांची हत्या करण्यात आली.
जमिनीच्या वादातून बोरी येथे कुऱ्हाडीने वार करून चुलत भावाचा खून
दीपक नाईक यांच्याशी वाद सुरू असल्याचा आवाज ऐकून त्यांची बहीण घराबाहेर आली. तिच्यासमोरच संशयितांनी दीपक यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यानंतर या दोघांनी त्यांच्या बहिणीवरही वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने मोठ्याने आरडाओरडा केल्यामुळे शेजारील लोक धावत आले. नागरिकांना पाहून दोन्ही संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
भावाला वाचवण्यासाठी आलेल्या बहिणीवरही संशयितांचा हल्ल्याचा प्रयत्न
घटनेची माहिती मिळताच फोंडा पोलीस स्थानकाचे उपअधीक्षक शिवराम वायंगणकर, निरीक्षक मोहन गावडे व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इस्पितळात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून संशयित साईदीप कुशन नाईक याला ताब्यात घेतले. तर, त्याचा भाऊ आणि दुसरा संशयित गौरेश कुशन नाईक हा फरार झाला आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस त्याचा शोध घेत होते आणि या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
फोंडा पोलिसांनी एका संशयिताला केली अटक; फरार आरोपीचा शोध सुरू