हापूसही मोठ्या प्रमाणात उपलब्ध

पणजी : यंदाचा हंगाम आंब्याच्या पिकासाठी अनुकूल ठरला असून आंब्याचे उत्पादन चांगले आले आहे. आंब्याचे पीक चांगले आल्यामुळे मानकुराद आंब्याला चांगला दर मिळाला आहे. हवामानाचा कोणताही फटका आंब्याच्या पिकाला बसलेला नाही. गोव्यातील बाजारपेठा सध्या आंब्यांनी भरल्या असून बाजारात मानकुराद तसेच हापूस आंबे मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. ग्राहकांकडूनही स्थानिक मानकुराद आंब्याला मोठी मागणी दिसून येत आहे.
अनुकूल हवामानामुळे गोव्यात मानकुराद आंब्याचे विक्रमी उत्पादन
गोव्याच्या मानकुराद आंब्यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. सुरुवातीला १,२०० रुपये डझन दराने विकला जाणारा मानकुराद आता अर्ध्या दरात उपलब्ध आहे. सध्या चांगल्या प्रतीचा मानकुराद सुमारे ६०० रुपये डझन, तर लहान आकाराचा मानकुराद सुमारे ३०० रुपये डझन दराने विकला जात आहे. दरात घट झाल्यामुळे सर्वसामान्यांनाही आता मानकुराद आंब्याची चव चाखता येत आहे.
बाजारात आवक वाढल्याने मानकुरादच्या दरात ५० टक्क्यांपर्यंत घट
आंब्याचे उत्पादन चांगले आल्याने हंगामही समाधानकारक सुरू आहे. उत्पादन वाढल्यामुळे बाजारात मानकुराद आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. परिणामी, दरात घट झाली आहे. उत्पादन जास्त झाल्यामुळे आणि आवक वाढल्याने शेतकऱ्यांना कमी दरात आंबे विकावे लागत आहेत. काही दिवसांत मानकुराद आंब्याची आवक हळूहळू कमी होईल, अशी माहिती कृषी संचालनालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
उत्पादन वाढल्याने मानकुरादचा हंगाम समाधानकारक; शेतकऱ्यांकडून मोठी आवक
वाढत्या तापमानाचा मानकुराद आंब्याच्या पिकावर कोणताही परिणाम झालेला नाही. आंबे लहान असते तर तापमानवाढीचा परिणाम झाला असता; मात्र आंबे पूर्ण वाढ झाल्यानंतर तापमान वाढल्याने पिकावर परिणाम झाला नाही. आता मानकुरादाचा हंगाम संपत आल्याने पुढील १५ ते २० दिवसांत त्याची आवक कमी होईल आणि त्यानंतर मुसरादसारख्या इतर आंब्यांच्या जातींचा हंगाम सुरू होईल, अशी माहिती कृषी संचालनालयातील अधिकाऱ्यांनी दिली.
तापमान वाढीचा पिकावर परिणाम नाही; लवकरच मुसराद आंब्याचा हंगाम सुरू होणार