अल्पवयीनावरील अत्याचार प्रकरणी बस कंडक्टरला १० वर्षांचा कारावास

मेरशी येथील पॉक्सो न्यायालयाचा निकाल : ४५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th April, 10:19 pm
अल्पवयीनावरील अत्याचार प्रकरणी बस कंडक्टरला १० वर्षांचा कारावास

पणजी : मुरगाव तालुक्यातील एका १७ वर्षीय मुलीवर बसमध्ये लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मेरशी येथील पॉक्सो न्यायालयाने २२ वर्षीय बस कंडक्टरला १० वर्षांचा सश्रम कारावास आणि ४५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्याचा निकाल न्या. पूजा कवळेकर यांनी दिला. वास्को पोलिसांनी बेपत्ता झालेल्या या १७ वर्षीय मुलीला, ती घरी जाण्यास तयार नसल्यामुळे मेरशी येथील ‘अपना घर’मध्ये दाखल केले होते. २६ जुलै २०२५ रोजी तिला अस्वस्थ वाटू लागल्याने बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले. ती गरोदर होती आणि अपना घरातील शौचालयात तिचा नैसर्गिकरीत्या गर्भपात झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. यानंतर जुने गोवा पोलिसांनी तिची जबानी नोंद केली असता, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले.

पॉक्सो न्यायालयाकडून बस कंडक्टरला १० वर्षांचा सश्रम कारावास

१३ जून २०२५ रोजी वास्कोत एका बसमध्ये कंडक्टरने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती पीडितेने जुने गोवा पोलिसांना चौकशीत दिली. त्यांनी ही माहिती वास्को पोलिसांना दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मयूर सावंत यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर महिला उपनिरीक्षक प्रियांका पाटील यांनी या तक्रारीची दखल घेत संशयिताविरोधात २७ जुलै २०२५ रोजी गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली. तपासादरम्यान पोलिसांनी पीडितेच्या जबानीला पुष्टी देणारे महत्त्वाचे पुरावे गोळा केले, जे न्यायालयात सादर करण्यात आले.

वास्को पोलिसांकडून संशयित बस कंडक्टरला अटक आणि दोषारोपपत्र सादर

१८ ऑगस्ट २०२५ रोजी पीडित मुलीची न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबानी नोंदवण्यात आली, ज्यामध्ये तिने एका युवकाची माहिती दिली. त्यानंतर ६ सप्टेंबर २०२५ रोजी ओळख पटल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली. तपास पूर्ण करून पोलिसांनी २१ सप्टेंबर २०२५ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सरकारी अभियोक्ता अर्चना भोबे आणि शिल्पा नागवेकर यांनी युक्तिवाद करत पुरावे सिद्ध केले. पीडित मुलीने ओळख परेडमध्ये संशयिताला ओळखले आणि तिची साक्ष या खटल्यात अत्यंत महत्त्वाची ठरली, ज्यामुळे गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा मिळणे शक्य झाले.

पीडित मुलीची साक्ष आणि ओळख परेड ठरली खटल्यात निर्णायक

न्यायालयाने आरोपीला भा.न्या.सं.च्या कलम ६४ अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंड (न भरल्यास एक महिना साधी कैद) सुनावला आहे. तसेच, पॉक्सो कायद्याच्या कलम ४ अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड, कलम ८ अंतर्गत ३ वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड, आणि कलम १२ अंतर्गत १ वर्ष साधी कैद व ५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. या सर्व शिक्षा आरोपीने एकत्र भोगायच्या आहेत, असे न्यायालयाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या निकालामुळे पीडितेला न्याय मिळाला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

कलम ६४ आणि पॉक्सो कायद्यांतर्गत आरोपीला ठोठावला ४५ हजारांचा दंड

#GoaCrime #POCSOAct #CourtVerdict #VascoNews #GoaPolice #JusticeForVictim #MarathiNews #BreakingNewsGoa