डॉ. मीनाक्षी हल्ला प्रकरणी पंच सदस्याला एका वर्षाची शिक्षा

एका आरोपीची निर्दोष सुटका

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st May, 09:45 pm
डॉ. मीनाक्षी हल्ला प्रकरणी पंच सदस्याला एका वर्षाची शिक्षा

पणजी : प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ तथा अभिनेत्री डॉ. मीनाक्षी मार्टिन्स यांच्यावरील हल्ला आणि विनयभंग प्रकरणी म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने साल्वादोर दी मुंदचे पंच सदस्य विजय दळवी यांच्या शिक्षेत वाढ केली आहे. न्यायालयाने त्यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा आणि नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले असून, अन्य एका महिला आरोपीलाही कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर, एका संशयिताची निर्दोष सुटका करण्यात आली आहे, असा आदेश न्या. अपूर्वा नागवेकर यांनी दिला. या निकालामुळे पीडितेला कायदेशीर लढा दिल्यानंतर मोठा दिलासा मिळाला आहे.

अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून पंच सदस्याच्या शिक्षेत वाढ आणि नुकसानभरपाईचे आदेश

बार्देश मामलेदार न्यायालयाच्या २०१३ मधील आदेशानुसार सार्वजनिक रस्ता मोकळा करण्यासाठी डॉ. मार्टिन्स आपल्या शेजाऱ्यांना मदत करण्यासाठी ३० जुलै २०१७ रोजी साल्वादोर दी मुंद येथे गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी विजय दळवी, श्वेता कांदोळकर आणि संशयित श्रीकांत आर्लेकर यांनी त्यांना अडवले. दळवी यांनी मार्टिन्स यांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत लज्जास्पद हावभाव केले. श्वेता कांदोळकर यांनी मार्टिन्स यांच्यावर मिरचीची पूड असलेले दगड आणि माती फेकली, ज्यामुळे त्यांच्या डोळ्यांना व चेहऱ्याला दुखापत झाली. तसेच त्यांचा मोबाईल हिसकावून फोडला आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी वरील आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली होती.

मिरची पूड फेकून हल्ला आणि अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

या घटनेनंतर म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने त्या तिघांना कारावासाची शिक्षा ठोठावून तक्रारदार डॉ. मीनाक्षी मार्टिन्स यांना भरपाई देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला तिघांनी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी म्हापसा येथील अतिरिक्त न्यायालयात झाली. उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत या खटल्याचा सखोल तपास करण्यात आला आणि पुराव्यांच्या आधारे दोषींवरील आरोप सिद्ध झाले.

प्रथमवर्ग न्यायालयाच्या निकालाला उत्तर गोवा सत्र न्यायालयात देण्यात आले होते आव्हान

या प्रकरणी सुनावणी झाली असता, एका लोकप्रतिनिधीने (पंच सदस्य) असे वर्तन करणे गंभीर आणि निंदनीय असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवून शिक्षेत वाढ केली. त्यानुसार, आरोपी विजय दळवी यांना भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत १ वर्षाची साधी कैद आणि १ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले. आरोपी श्वेता कांदोळकर यांना भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत सहा महिन्यांची साधी कैद आणि ७५ हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले. तर, श्रीकांत आर्लेकर यांची कोणतीही सक्रिय भूमिका सिद्ध न झाल्यामुळे न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केले. लोकप्रतिनिधींनी समाजात आदर्श वर्तणूक ठेवणे गरजेचे असल्याचे ताशेरे न्यायालयाने यावेळी ओढले.

विजय दळवी यांना १ लाखाचा तर श्वेता कांदोळकर यांना ७५ हजारांचा दंड

#MeenacshiMartins #CourtVerdict #MapusaCourt #GoaNews #JusticeForWomen #SalvadorDoMundo #GoaCrimeNews #MarathiNews