कुत्र्यांसाठी ‘फीडिंग स्पॉट’ उभारण्याकडे नगरपालिकांचे दुर्लक्ष

केवळ २५ टक्केच कार्यरत : म्हापसा, फोंडा वगळता अन्य नगरपालिकांची कामगिरी निराशाजनक

Story: समीप नार्वेकर |
02nd May, 09:58 pm
कुत्र्यांसाठी ‘फीडिंग स्पॉट’ उभारण्याकडे नगरपालिकांचे दुर्लक्ष

पणजी : रस्त्यावरील कुत्र्यांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ‘फीडिंग स्पॉट’ उभारण्याचे काम गोव्यातील नगरपालिकांमध्ये अत्यंत संथ गतीने सुरू आहे. आवश्यकतेच्या तुलनेत राज्यात सध्या केवळ २५ टक्केच फीडिंग स्पॉट कार्यरत असून, म्हापसा आणि फोंडा वगळता अन्य बहुतांश नगरपालिकांनी यात उदासीनता दाखवली आहे, अशी माहिती नगरविकास खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व नगरपालिकांना रस्त्यावरील कुत्र्यांसाठी फीडिंग स्पॉट उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना निश्चित ठिकाणी अन्न देणे शक्य होईल आणि कुत्र्यांचा रस्त्यावरचा वावर कमी होईल, असे खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतरही नगरपालिकांकडून अंमलबजावणीत टाळाटाळ

प्राणी जन्म नियंत्रण (एबीसी) नियमांनुसार प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रात किमान चार फीडिंग स्पॉट असणे बंधनकारक आहे. राज्यातील १४ नगरपालिकांचे एकूण क्षेत्रफळ १९९ चौरस किलोमीटर असल्याने सुमारे ७७२ फीडिंग स्पॉटची गरज आहे; मात्र प्रत्यक्षात केवळ १९९ फीडिंग स्पॉट कार्यरत आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही संख्या कमी का आहे, याबाबत नगरपालिकांना स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. फीडिंग स्पॉट उभारण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण काही नगरपालिकांनी दिले असून, सार्वजनिक ठिकाणी हे स्पॉट उभारण्यास मर्यादा येत आहेत. त्यामुळे कमी वाहतूक असलेली जागा शोधणे कठीण जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

जागेअभावी फीडिंग स्पॉट उभारण्यात नगरपालिकांसमोर तांत्रिक अडचणी

सध्या फीडिंग स्पॉट उभारण्यात म्हापसा आणि फोंडा या नगरपालिकांची कामगिरी सर्वोत्तम आहे. म्हापसा नगरपालिकेला ४४ स्पॉटची गरज असताना सध्या ५४ स्पॉट कार्यरत आहेत. फोंडा नगरपालिकेत २० स्पॉटची गरज असताना तेथे २४ स्पॉट कार्यरत आहेत. दुसरीकडे मुरगाव, डिचोली, केपे, साखळी, सांगे आणि वाळपई नगरपालिकांची कामगिरी अत्यंत कमी असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. याबाबत पुन्हा स्पष्टता देण्यासाठी खात्याने नगरपालिकांशी पत्रव्यवहार केला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

म्हापसा आणि फोंडा नगरपालिकांची कामगिरी सर्वोत्तम; मडगाव-मुरगाव पिछाडीवर

नगरपालिका क्षेत्रफळ (चौ.किमी) गरजेचे स्पॉट कार्यरत स्पॉट
पणजी८.१२३२२०
मडगाव१५.१६०१८
मुरगाव२७.३०१०८०४
म्हापसा११.०३४४५४
फोंडा५.२२०२४
कुंकळ्ळी२८.६११२१४
काणकोण१८.७७२०४
कुडचडे१८.७८८४३
केपे१४.१५६०५
साखळी१४.७५६०३
सांगे४.९१६०३
पेडणे२.५२०८०४
वाळपई११.७४४०१

नगरपालिका निहाय फीडिंग स्पॉटची सद्यस्थिती दर्शवणारा तक्ता

#GoaNews #StreetDogs #AnimalWelfare #FeedingSpots #MunicipalCouncilGoa #Panaji #MarathiNews #GoaCivicIssues