वाघाच्या मृत्यूच्या चौकशीसाठी तज्ज्ञांची समिती स्थापन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd May, 11:21 pm
वाघाच्या मृत्यूच्या चौकशीसाठी तज्ज्ञांची समिती स्थापन

पणजी : साकोर्डे येथे जंगलात वाघाचा सांगाडा सापडला होता. वाघाच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए), वन खाते आणि पशुवैद्यकीय खात्याच्या अधिकाऱ्यांची समिती वाघाच्या मृत्यूची चौकशी करणार आहे.

वन खात्याचे अधिकारी जीस वर्की यांनी ही माहिती दिली. वाघ म्हातारा झाल्याने त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, सविस्तर चौकशीनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. साकोर्डे परिसरात अनेक वर्षांपासून शिकारी सावजांच्या शोधात फिरत असतात. त्यामुळे शिकाऱ्यांकडून वाघाची हत्या झाल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

साकोर्डे जंगलात पट्टेरी वाघाच्या कातडीचे दोन तुकडे सापडले असून त्याचा पंचनामा करण्यात आला आहे. वाघाचा मृत्यू झाल्याचे निश्चित झाले आहे. तो म्हातारा झाल्याने मृत्यू झाला असावा, असे सध्या वाटत असले तरी शवचिकित्सा आणि चौकशीनंतरच खरे कारण समोर येईल, असे जीस वर्की यांनी सांगितले.

गोव्यात सध्या पाच पट्टेरी वाघ असल्याचे स्पष्ट झाले आहे. मृत्यू झालेला वाघ यापैकीच एक आहे की दुसरा, हे चौकशीनंतर समजेल. २००९ मध्ये १ तर २०१९ मध्ये चार वाघांचा मृत्यू झाला आहे. वाघांची संख्या आधीच कमी होत असताना आणखी एका वाघाचा मृत्यू होणे ही चिंतेची बाब मानली जात आहे. त्यामुळे मृत्यूचे कारण शोधणे महत्त्वाचे ठरणार आहे.

२०१९ मध्ये सत्तरी तालुक्यात वाघाची हत्या झाल्याची घटना घडली होती. ज्या परिसरात सांगाडा सापडला, त्या भागात शिकारी फिरत असतात. त्यामुळे हत्या झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा