दोघा संशयिताना अटक : मारहाण केल्याने मृत्यू
म्हापसा : खडपावाडा - कुचेली येथील रहिवासी सुभाष रामा नाईक (वय ६१) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला शवविच्छेदन अहवालानंतर वेगळे वळण मिळाले आहे. सुरुवातीला नैसर्गिक वाटणाऱ्या या मृत्यू प्रकरणी म्हापसा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला. या प्रकरणी पोलिसांनी अॅराॅन आग्नेलो फर्नांडिस आणि राम प्रसाद गुईन या दोघा संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या तत्पर कारवाईमुळे या प्रकरणातील गुपित उघड झाले आहे.
शवविच्छेदन अहवालानंतर नैसर्गिक मृत्यूच्या दाव्याचा पर्दाफाश
शुक्रवार १ मे रोजी सुभाष नाईक यांचा मृत्यू झाल्या होता. त्यानंतर एका बाजूला अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी या घटनेबाबत तीव्र संशय व्यक्त केला. या घटनेची गांभीर्याने दखल घेत म्हापसा पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठवला होता. कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळेच या हत्येचा तपास करणे शक्य झाले.
कुटुंबीयांच्या संशयामुळे पोलिसांनी रोखले अंत्यसंस्कार; मृतदेह पाठवला शवविच्छेदनासाठी
त्यानंतर शनिवारी वैद्यकीय अहवाल हाती येताच पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान पोलिसांनी या हत्येमागील नेमके कारण कौटुंबिक वाद आहे की जुन्या वैमनस्यातून हा प्रकार घडला आहे, या दिशेने तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालात शरीरावर मारहाणीच्या खुणा आणि अंतर्गत जखमा असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांचा संशय बळावला होता.
वैद्यकीय अहवालात खुनाचा खुलासा; पोलिसांनी सुरू केला कसून तपास
या प्रकरणाचा पुढील तपास म्हापसा पोलीस निरीक्षक नवीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांनी तपासाचा एक भाग म्हणून सुभाष नाईक यांनी ज्या बारला भेट दिली होती, तेथील बार मालकाचा मुलगा अॅराॅन आग्नेलो फर्नांडिस आणि कामगार राम प्रसाद गुईन या दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली असता, त्या दोघांनी सुभाष नाईकला मारहाण केल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी त्या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली. बारमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हत्येत झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
बारमधील वादातून मारहाण; बार मालकाचा मुलगा आणि कामगार गजाआड