अनेकत्वातून एकता साधणारी भारतीय संस्कृती. काळ बदलला. बदलत्या काळानुसार नवनिर्मितीची साधने उपलब्ध झाली तरी सुद्धा प्राचीन काळापासून चालत असलेल्या सण उत्सवांच्या परंपरामध्ये किंचितही बदल झालेला नाही. सण-उत्सवांच्या निमित्ताने एकत्र येणारा लोकमानस आजही पहावयास मिळतो.

मानवी जीवनामध्ये एकात्मतेची गरज आहे. हे ओळखून श्रद्धास्थानांची निर्मिती झाली. गोव्यातील लोक आस्तिक आहेत. त्यांची देवावर अतिशय श्रद्धा आहे. ती श्रद्धा आजपर्यंत कमी झालेली नाही म्हणूनच तो गावामध्ये होणाऱ्या उत्सवाला वेळात वेळ काढून उपस्थित रहातात. देवावरील श्रद्धेला तडा जाऊ न देता आपल्या हातून ज्या पद्धतीने सेवा होईल त्या पद्धतीने ती करण्याचा प्रयत्न करतात आणि तो विश्व विधातासुद्धा श्रद्धेने केलेली सेवा मोठ्या मनाने पावन करुन घेतो. संकट काळी धावत येणारा अशी मानवाची श्रद्धा असल्याने अडल्या नडल्यावेळी परमेश्वराचा धावा करून तो हा संसाररूपी भवसागर पार करीत असतो. देवाची कृपादृष्टी व्हावी म्हणून भक्तीभावाने त्यांना शरण जातो. वेळप्रसंगी त्याला नवसाचे आमिषही दाखवतो.
फोंडा तालुक्यातील म्हार्दोळ या निसर्गसंपन्न गावामध्ये भव्यदिव्य असे महालसा मंदिर आहे. महालसा हे मोहिनी रुप. येथे पर्यटकांची सतत गर्दी असते. मंदिरासमोर २१ माली असलेली एक मोठी पितळी समई आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवाच्यादिवशी सर्व माल्याने तेल-वात घालून तरी प्रज्वलित केली जाते. हे दृश्य अतिशय विलोभनीय असे असते.
निसर्गसौंदर्याने नटलेल्या या गावाचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे फुलणारी जाईची फुले. श्रावण बरसू लागला की, जाईंच्या झाडांना बहर येतो. येथील बरेचशे लोक फुले विकण्याचा व्यवसाय करतात. गोमंतकातील प्रसिद्ध ‘फुलकार’ अशी त्यांची ख्याती आहे. कोणतीही फुले कलात्मकरीत्या कशी गुंफावयाची याचे सखोल ज्ञान असणारे कलाकारही म्हार्दोळ गावात पहायला मिळतात. म्हार्दोळ भागामध्ये जाईचे पुष्कळ मळे आहेत. पावसाळ्यात फुलणारी व देवदेवतांच्या चरणकमलावर विराजमान होणारी ही जाईची फुले म्हार्दोळचा सारा परिसर सुगंधित करून सोडतात. मूर्ती लहान पण कीर्ती महान. पांढरी शुभ्र, आकाराने छोटी, पण सर्वांचे लक्ष वेधून घेणारी सुगंधाने मनमोहून टाकणारी फुले घ्यावी तर म्हार्दोळ गावचीच; कारण या फुलांचा सुगंधसुद्धा काही वेगळाच असतो. श्रावण महिन्यात फुलणारी ही फुले सर्व प्रथम म्हार्दोळ गावात विक्रीस येताना दिसतात. मात्र फुलांचा व्यवसाय करणारा फुलकार समाज एक दिवस संपूर्ण फुले देवीसाठी राखून ठेवतो. इतर मंदिरातूनही जायाची पूजा होेते. पण म्हार्दोळची जायांची पूजा गोमंतकामध्ये प्रसिद्ध आहे. भाद्रपद वद्य तृतीया या दिवशी महालसेच्या मंदिरात गावातील सर्व जाईची फुले एकत्र करून जायांनी मंदिर सुशोभित करतात. दरवर्षी जाईंच्या फुलांनी सजवलेल्या गरुड, सुखासन, मयुरासन, शेषासन अशा निरनिराळ्या आसनात बसवून देवीची पूजा केली जाते. यावेळी सुगम संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते. शंभर वर्षांची परंपरा असलेली ही पूजा सुरू होण्यामागचे कारणही सांगितले जाते. जवळजवळ एकशे आठ वर्षांपूर्वी म्हार्दोळ या गावी पटकीची साथ सुरू झाली. औषधी उपचारांना रोगी साथ देईना. माणसे दगावू लागली. लोक भयभीत झाले. त्यांनी देवीला साकडे घातले. आपण सर्वजण मिळून एक दिवस एकाही जाईची विक्री न करता सर्व जाया तुझ्या चरणकमलाशी वाहून तुझी सेवा करीन. संकटसमयी धावून येणाऱ्या त्या विधात्याने लोकांचे म्हणणे ऐकले. त्याची कृपादृष्टी होऊन संपूर्ण गाव रोगराईमुक्त झाला. त्यावेळेपासून 'जाया पूजेची' प्रथा सुरू झाली.