तामिळनाडूत सत्तास्थापनेसाठी ‘टीव्हीके’ला ११ आमदारांची गरज; पर्यायांची चाचपणी सुरू

राजकीय निरीक्षकही पर्यायांची चाचपणी करण्यात मग्न

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
तामिळनाडूत सत्तास्थापनेसाठी ‘टीव्हीके’ला ११ आमदारांची गरज; पर्यायांची चाचपणी सुरू

चेन्नई: तामिळनाडूच्या राजकारणाने ऐतिहासिक वळण घेत, अभिनेता सी. जोसेफ विजय यांच्या तमिऴगा वेत्री कळगम (TVK, टीव्हीके) पक्षाने पहिल्याच निवडणुकीत १०८ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून बाजी मारली आहे. मात्र, २३४ सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेली ११८ संख्या गाठण्यासाठी टीव्हीकेला अजून ११ आमदारांची गरज आहे. सध्या पर्यायांची चाचपणी सुरू झाली आहे. राजकीय निरीक्षकही बहुमताचा आकडा गाठण्यासाठी असलेल्या पर्यायांची चाचपणी करण्यात मग्न आहेत.  

विजय यांनी दोन मतदारसंघांतून विजय मिळवल्याने त्यांना एक जागा रिकामी करावी लागणार आहे. त्यामुळे पक्षाची ताकद १०७ वर येईल आणि सत्तास्थापनेसाठी आवश्यक आमदारांची गरज अधिक ठळकपणे जाणवते.

 काँग्रेस-डावे-टीव्हीके आघाडीचा पर्याय

विजय यांच्या वडिलांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसला ( Indian National Congress) आघाडीचे खुले आमंत्रण दिले आहे. मात्र, काँग्रेसकडे केवळ ५ जागा असल्याने एकट्याने बहुमत शक्य नाही.

टीव्हीके: १०७, कॉंग्रेस: ५, डावे (सीपीआय, सीपीएम):४, आयुएमल: २ मिळून ११८ (बहुमत पू्र्ण). हा पर्याय संख्यात्मकदृष्ट्या शक्य असला तरी विविध विचारसरणींचा समन्वय साधणे हे मोठे आव्हान ठरू शकते.

एआयएडीएमके सोबत आघाडी; स्थिर सरकारचा मार्ग? 

निवडणुकीत दोन्ही प्रमुख द्रविड पक्षांवर टीका करूनही टीव्हीके आता एआयएडीएमके सोबत हातमिळवणी करू शकते. टीव्हीके: १०७, एआयएडीएमके :४७ मिळून १५४ मजबूत बहुमत. हा पर्याय अधिक स्थिर सरकार देऊ शकतो, मात्र राजकीय तडजोडी आवश्यक ठरतील. 

 बाह्य समर्थनाचा पर्याय

डिएमके (DMK) किंवा एआयएडीएमकेकडून  (AIADMK ) बाहेरून समर्थन मिळाल्यास सरकार स्थापन होऊ शकते. मात्र, अशा सरकारवर दबाव आणि अस्थिरतेचे सावट कायम राहण्याची शक्यता आहे. 

 बंडखोरी आणि पोटनिवडणुकीचे गणित

मध्यप्रदेशातील २०२०च्या राजकीय घडामोडींप्रमाणे काही आमदार बंड करून टीव्हीकेमध्ये सामील झाल्यास समीकरण बदलू शकते. टीव्हीके : १०७, बंडखोर आमदार: १५ मिळून १२२ स्पष्ट बहुमत.

यानंतर पोटनिवडणुकीत विजय मिळवत टीव्हीके आपली सत्ता अधिक मजबूत करू शकते. या पर्यायांची सध्या राजकीय निरीक्षक चर्चा करीत आहेत. 

तामिळनाडूच्या राजकारणात पारंपरिक द्रविडीयन वर्चस्वाला मोठा धक्का देत विजय यांचा टीव्हीके (TVK) पक्ष सत्तेच्या उंबरठ्यावर उभा आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास आघाड्या, तडजोडी आणि राजकीय कौशल्यावर अवलंबून राहणार आहे.

हेही वाचा