युद्ध पुन्हा भडकले: इराणच्या यूएईवरील ड्रोन हल्ल्यात ३ भारतीय नागरिक जखमी

होर्मुझमध्ये इराणच्या जहाजांवर अमेरिकेचा हल्ला; तेलाचे दर प्रति बॅरल ११४ डॉलर

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
युद्ध पुन्हा भडकले: इराणच्या यूएईवरील ड्रोन हल्ल्यात ३ भारतीय नागरिक जखमी

तेहरान :  मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आला असून इराणने (Iran) संयुक्त अरब अमिरातीवर (United Arab Emirates ) (यूएई)  ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले. होर्मुझ सामुद्रधुनीत ही तणाव वाढला असून, अमेरिकेने इराणच्या जहाजांवर हल्ला केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा युद्ध भडकल्याचे दिसत आहे. 

यूएईमधील फुजैराह ऑइल इंडस्ट्री झोनमध्ये ड्रोन हल्ल्यामुळे आग लागल्याची घटना घडली. हा भाग देशातील सर्वात मोठ्या तेल साठवण केंद्रांपैकी एक मानला जातो. एप्रिल ८ रोजी झालेल्या युद्धविरामानंतरचा हा पहिलाच मोठा हल्ला असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

दरम्यान, अमेरिकन (United States) सैन्याने होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz)  परिसरात इराणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा केला आहे. तसेच जहाजांना धोका निर्माण करणाऱ्या सहा इराणी स्पीडबोट्स नष्ट करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  यांनी इराणने अनेक व्यापारी जहाजांवर हल्ला केल्याचा आरोप केला.  मात्र मोठे नुकसान झाले नसल्याचेही स्पष्ट केले. दुसरीकडे, इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची ( Abbas Araghchi)  यांनी अमेरिकेसोबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले, पण “प्रोजेक्ट फ्रीडम” सारख्या लष्करी कारवाया समस्येचे समाधान ठरू शकत नाहीत, अशी टीका केली.

इराणने १४ मुद्द्यांचा शांतता प्रस्ताव अमेरिकेसमोर ठेवला असला तरी त्यावर अजून स्पष्ट निर्णय झालेला नाही. त्यामुळे युद्धविराम कायम आहे की पुन्हा संघर्ष भडकणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे.

या वाढत्या तणावाचा जागतिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम दिसून आला असून ब्रेंट क्रूड तेलाचे दर प्रति बॅरल सुमारे ११४ डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. शेअर बाजारातही घसरण पाहायला मिळत आहे. एकूणच, मध्यपूर्वेतील ही परिस्थिती अधिकच चिघळत असून, जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा