
लखनौ: वय हे केवळ एक आकडा असतो आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतीही वेळ नसते, हे लखनौमधील ७१ वर्षीय अशोक बहार यांनी कृतीतून सिद्ध केले आहे. आपल्या दिवंगत आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी बहार यांनी रविवारी पार पडलेली 'नीट-२०२६' (NEET-UG) ही कठीण वैद्यकीय प्रवेश परीक्षा दिली. परीक्षा केंद्रावर तरुण मुलांच्या गर्दीत ७१ वर्षांचे बहार जेव्हा पोहोचले, तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्या जिद्दीकडे वळल्या होत्या.
अशोक बहार यांचे वडील लखनौमधील एक नामवंत डॉक्टर होते. मुलानेही वडिलांचा वारसा चालवावा, असे त्यांच्या आईला मनापासून वाटत होते. पदवी शिक्षण सुरू असताना बहार यांनी अनेकदा वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी प्रयत्न केले, परंतु त्यावेळी नशिबाने साथ दिली नाही. त्यानंतर त्यांनी 'इंडियन ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड' मध्ये वरिष्ठ पदावर काम केले आणि परराष्ट्र मंत्रालयात सल्लागार म्हणूनही सेवा दिली. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही त्यांच्या मनात डॉक्टर बनण्याची इच्छा कायम होती.
बहार यांचे कुटुंब वैद्यकीय क्षेत्राशी घट्ट जोडलेले आहे. त्यांच्या कुटुंबात तब्बल २० डॉक्टर असून त्यातील काही परदेशातही कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या पत्नी डॉ. मंजू बहार या प्रसूती तज्ज्ञ असून त्यांनीच अशोक यांना पुन्हा एकदा परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिले. मी पत्नीकडून वैद्यकीय क्षेत्रातील बरेच ज्ञान मिळवले आहे, पण पदवी नसल्याने मला औषधे लिहून देण्याचा अधिकार नाही. हाच कायदेशीर अडथळा दूर करण्यासाठी मी ही परीक्षा दिली, असे बहार यांनी सांगितले.
अशोक बहार यांना केवळ पदवी मिळवायची नाही, तर त्यांना 'हिपॅटोलॉजी' (यकृत शास्त्र) मध्ये विशेष प्राविण्य मिळवायचे आहे. सध्याच्या काळात 'फॅटी लिव्हर'चा आजार एखाद्या महामारीप्रमाणे पसरत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची अधिकृतपणे सेवा करता यावी, यासाठी ते एमबीबीएस करू इच्छितात.
रविवारी लखनौमधील ७६ केंद्रांवर सुमारे ३७,१७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. कडक बायोमेट्रिक सुरक्षा आणि तपासणीनंतर बहार यांनी शांतपणे आपली परीक्षा पूर्ण केली. प्रतिकूल परिस्थितीतही आपले स्वप्न जिवंत ठेवणारे अशोक बहार आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. "स्वप्न पाहणे कधीही सोडू नका, हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.