‘ऐतिहासिक’ विजय : पंतप्रधान नरेंद्र मोदी; मुख्यमंत्री पदासाठी नावे चर्चेत

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये प्रथमच भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार स्थापन होणार आहे. ९ मे रोजी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे हा दिवस महान कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीचा असल्याने या घटनाक्रमाला अधिक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
भाजपने राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला (TMC) पराभूत करत तब्बल १५ वर्षांची ममता बॅनर्जी यांची सत्ता संपुष्टात आणली. पूर्व भारतातील विरोधकांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये भाजपचा हा पहिलाच सत्तेवर येण्याचा पराक्रम ठरला आहे.
मुख्यमंत्री पदासाठी नावे चर्चेत
पश्चिम बंगालात (West Bengal) भाजपच्या मुख्यमंत्री (BJP Chief Minister) पदाच्या उमेदवाराचे नाव अजून निश्चित झाले नाही. तरीही काही नावे चर्चेत आहेत. त्यात विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी, ज्येष्ठ नेते तथा माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, विद्यमान पश्चिम बंगाल भाजप प्रदेशाध्यक्ष शमीक भट्टाचार्या, राष्ट्रीय प्रवक्त्या अग्निमित्रा पॉल, ज्येष्ठ नेते तथा आमदार शंकर घोष यांच्या नावाचा समावेश आहे.
‘ऐतिहासिक’ विजय : पंतप्रधान नरेंद्र मोदी
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी या विजयाला ‘ऐतिहासिक’ असे संबोधले. आहे. नवी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हा जनादेश बदलाची आणि भीतीमुक्त भविष्याची इच्छा दर्शवत असल्याचे नमूद केले.
मोदी यांनी पुढे ‘बदला नव्हे, बदल’ हा मंत्र देत राजकीय हिंसाचाराला पूर्णविराम देण्याचे आवाहन केले. तसेच, विकासाभिमुख राजकारणावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या विजयात महिला मतदारांची निर्णायक भूमिका असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
निकाल देशभरातील बदलत्या राजकीय प्रवाहाचे द्योतक
एकूणच, पश्चिम बंगालमधील हा निकाल देशभरातील बदलत्या राजकीय प्रवाहाचे द्योतक मानला जात आहे. दीर्घकाळ टिकलेल्या प्रादेशिक सत्तेचा अंत आणि पूर्वेकडील भाजपचा मोठा उदय हा या निवडणुकीचा प्रमुख ठळक मुद्दा ठरला आहे.