वेळसाव रेल्वे भूसंपादन बेकायदा, आंदोलनाचा इशारा

सुनावणी होत नसल्याचा आरोप : खासदार, आमदारांची उपस्थिती


2 hours ago
वेळसाव रेल्वे भूसंपादन बेकायदा, आंदोलनाचा इशारा

अधिकाऱ्यांशी चर्चा करताना खासदार विरियातो फर्नांडिस. सोबत आमदार एल्टन डिकॉस्टा व इतर.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : वेळसाव येथे रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी भूसंपादनाची प्रक्रिया झालेली नाही. जागेची मालकी स्थानिकांकडे असूनही रेल्वेकडून काम सुरू आहे. याशिवाय २०२२ पासून सुरू असलेली सुनावणी पूर्ण होत नाही हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप खासदार विरियातो फर्नांडिस यांनी केला. आता आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस आणि केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वे विभागात सुरू असलेल्या सुनावणीवेळी उपस्थिती दर्शवत जागा बळकावून केल्या जाणाऱ्या प्रकल्पाला विरोध दर्शवला. स्थानिकांच्या जमिनी बळकावल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. रेल्वे प्रशासनाकडून वेळसाव परिसरात दुपदरीकरणासाठी खासगी जमिनी ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. याला स्थानिकांनी विरोध केला आहे. या जमिनींचा ताबा रेल्वेकडे नसतानाही त्यांनी काम सुरू केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
केपेचे आमदार डिकॉस्टा यांनी म्हटले की, स्थानिकांच्या जमिनी आणि घरे धोक्यात असताना शांत बसणार नाही. रेल्वेने कागदपत्रांशिवाय आणि ग्रामस्थांच्या संमतीशिवाय खासगी मालमत्तेत काम सुरू केल्याचा आरोप आहे. वेळसाव पंचायतीने या कामाला स्थगिती दिली असतानाही काम सुरू असल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. सरकारने आणि रेल्वेने तातडीने भूसंपादन थांबवले नाही, तर वेळसावसह राज्यभर जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
जनहिताचा बळी देऊन विकास प्रकल्प लादला जाऊ नये. स्थानिकांच्या जागा असून त्यांनी सुनावणीवेळी आवश्यक कागदपत्रे सादर केली; पण रेल्वेकडून भू संपादनाची कागदपत्रे देण्यात आलेली नाहीत. सुनावणी वारंवार पुढे ढकलून वेळ काढला जात आहे. दुसरीकडे रेल्वेचे काम मात्र सुरूच आहे.
_ विरियातो फर्नांडिस, खासदार, दक्षिण गोवा

हेही वाचा