८५ हजार रुपयांचा दंड : पणजी पोक्सो न्यायालयाचा निकाल

पणजी : पेडणे तालुक्यातील विज्ञान विषयात नापास करण्याची आणि फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी पणजी येथील पाॅक्सो न्यायालयाने ५४ वर्षीय विज्ञान शिक्षकाला ११ वर्षांच्या सश्रम कारावास आणि ८५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. याबाबतचा आदेश न्या. पूजा कवळेकर यांनी दिला.
या प्रकरणी पेडणे पोलिसांनी १५ जून २०२० रोजी गुन्हा दाखल केला. त्यानुसार, २०१५ ते २०१९ या कालावधीत आरोपीने आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीला विज्ञान विषयात नापास करण्याची धमकी दिली. तसेच तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलगी त्यावेळी केवळ १६ वर्षांची होती. या घटनेची वाच्यता केल्यास तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याची माहिती तक्रारीत नमूद केली. या तक्रारीची दखल घेऊन तत्कालीन पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी यांनी संशयित शिक्षका विरोधात गुन्हा दाखल करून १५ जून २०२० रोजी अटक केली. त्यानंतर तपासपूर्ण करून ७ आॅगस्ट २०२० रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
दरम्यान संशयिताने पाॅक्सो न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. तो न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर संशयिताने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. त्यावेळी उच्च न्यायालयाने १५ एप्रिल २०२१ रोजी सशर्त जामीन मंजूर केला. त्यानंतर पाॅक्सो न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन आरोप निश्चित करून खटला सुरू केला. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, सरकारी अभियोक्ता अर्चना भोबे आणि शिल्पा नागवेकर यांनी युक्तिवाद करत पुरावे सिद्ध केले. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनी आणि शाळेतील इतर शिक्षिकांनी दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. याची दखल घेऊन न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले. त्यानंतर आरोपीला विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी ११ वर्षे सश्रम कारावास आणि ८५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
विविध कलमांन्वये शिक्षा
न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अंतर्गत ११ वर्षे सश्रम कारावास आणि ५० हजार रुपये दंड (न भरल्यास एक महिना साधी कैद) सुनावला आहे. तसेच, पॉक्सो कायद्याच्या कलम ४ अंतर्गत ११ वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड, कलम ८ अंतर्गत ३ वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड व इतर शिक्षा ठोठावली. या सर्व शिक्षा आरोपीने एकत्र भोगायच्या आहेत, असे न्यायालयाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.