खाजोर्डा-बोरी येथील खून प्रकरणातील फरार संशयित अटकेत

दुसऱ्या संशयिताला दहा दिवसांची पोलीस कोठडी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th May, 11:15 pm
खाजोर्डा-बोरी येथील खून प्रकरणातील फरार संशयित अटकेत

फोंडा : खाजोर्डा-बोरी येथे रविवारी जमिनीच्या वादातून दीपक राया नाईक (५८) यांचा कुऱ्हाडीने खून केल्यानंतर फरार झालेला मुख्य संशयित गौरेश कुशन नाईक याला सोमवारी संध्याकाळी अटक करण्यात फोंडा पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा अटक करण्यात आलेला दुसरा संशयित साईदीप कुशन नाईक याला न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे बोरी परिसरात खळबळ माजवून फरार झालेल्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आले आहे.

बोरी खून प्रकरणातील मुख्य संशयित गौरेश नाईक पोलिसांच्या जाळ्यात

रविवारी संध्याकाळी जमिनीच्या वादातून हा धक्कादायक प्रकार घडला होता. यावेळी सर्वप्रथम डोक्यावर व नंतर गळ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून गौरेश नाईक तेथून पसार झाला होता. दरम्यान, पोलिसांनी पकडलेले साईदीप आणि गौरेश हे दोन्ही संशयित मृत दीपक नाईक यांच्या चुलत भावाचे मुलगे आहेत. सख्ख्या चुलत भावांनीच जमिनीच्या तुकड्यासाठी दीपक नाईक यांचा क्रूरपणे बळी घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जमिनीच्या वादातून सख्ख्या चुलत भावांनीच केला दीपक नाईक यांचा काटा

या घटनेनंतर सोमवारी सकाळी दीपक नाईक यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर दुपारी तो कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. फोंडा पोलीस स्थानकाचे उपअधीक्षक शिवराम वायंगणकर व निरीक्षक मोहन गावडे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. हत्येसाठी वापरलेली कुऱ्हाड आणि इतर पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात; पोलीस तपासाला वेग

#PondaCrime #GoaPolice #MurderInvestigation #BoriNews #GoaNews #CrimeUpdate #BreakingNewsGoa #MarathiNews
हेही वाचा